Maharashtra Weather News : काही दिवसांपूर्वीच मान्सूननं संपूर्ण देश व्यापला आणि उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत ते अगदी पूर्वेपासून पश्चिमेुपर्यंत सर्वत्र फक्त आणि फक्त पावसाचीच हजेरी पाहायला मिळाली. इथं उत्तर भारतातील पर्वतीय राज्यांमध्ये पावसानं थैमान घातलं असून या भागांमध्ये हवामान विभागानं अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे, तर महाराष्ट्रातही असंच काहीसं चित्र असून, कोकणासह घाटमाथ्यावरील भागांसह आता विदर्भातसुद्धा पावसाचा जोर वाढेल असा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे.
मान्सून मोठ्या तीव्रतेनं सक्रिय असल्या कारणानं राज्याच्या विदर्भ, कोकण भागासह घाट क्षेत्राला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात प्रामुख्यानं वाशिम, अमरावती, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली इथं पावसाचा जोर वाढलेला असेल.
कोकणात प्रामुख्यानं रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग, रायगड इथं पावसाचा जोर वाढेल. तर, पश्चिम महाराष्ट्रात पुणे घाटमाथा, कोल्हापूर घाटमाथा आणि इथं मुंबई शहर- उपनगरांमध्येही पावसाच्या जोरदार सरींची शक्यता वर्तवण्यात आली असून यादरम्यान सोसाट्याचा वाराही सुटणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही भागांमध्ये पावसानं उसंत घेतली तरीही ढगाळ वातावरण मात्र कायम राहणार असल्यानं लख्ख सूर्यप्रकाशाचा अभाव कायम राहणार आहे.
उत्तर पश्चिमी भारतीय राज्यांमध्ये 8 ते 13 जुलैदरम्यान पावसाची समाधानकारक हजेरी असेल असा अंदाज आयएमडीनं वर्तवला असून यामध्ये राजस्थान, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिमी उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणाचा समावेश आहे. तर, हिमालयाच्या पश्चिमेकडील मैदानी क्षेत्रामध्ये पुढील सात दिवस पावसाच्या तुरळक सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पूर्वोत्तर भारतामध्ये येत्या काही दिवसात कमी दाबाचं क्षेत्र आणखी तीव्र होणार असून त्यामुळं मणिपूर, मिझोरम, आसाम, मेघालय, नागालँड, त्रिपुरा अशा वेगवेगळ्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.