Maharashtra Weather News : देशाच्या उत्तराखंडपासून ते हिमाचलसारख्या राज्यांमध्ये पावसानं थैमान घातलं आहे. असं असतानाच पुढील 6 ते 7 दिवस जम्मू काश्मीरसह वरील राज्यांमध्ये पावसाची हजेरी कायम असेल असा इशारा केंद्रीय हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. तर, गुजरातसह महाराष्ट्रातील काही भागांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.
महाराष्ट्रात प्रामुख्यानं कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढतच राहणार असून, उर्वरित भागांमध्ये ढगांची चादर पाहायला मिळेल. ढगाळ वातावरणामुळं सूर्यदर्शन इतक्यात होणार नसल्याचच स्पष्ट होत आहे. दरम्यान राज्याच्या कोकण आणि घाट क्षेत्रासाठी कोसळधारीचा इशारा पाहता ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, विदर्भातील काही भागांसह उत्तर महाराष्ट्राला यलो अलर्ट जारी केला आहे.
लोणावळा, महाबळेश्वर आणि माथेरानसह राज्यातील इतर घाटमाथ्यावरील क्षेत्रांमध्ये बहुसंख्य ठिकाणी मान्सूनने हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला. वेगरिज ऑफ द वेदरकडून याबाबतची माहिती जारी कर जून महिन्यात मान्सूननं कोकणासह मध्य महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावल्यालं या निरीक्षणातून स्पष्ट झालं.
(पाऊस मिमीमध्ये)
इगतपुरी- 1049
खिरेश्वर- 776
भीमाशंकर- 970
माथेरान- 1210
लोणावळा- 1330
बंगालच्या उपसागरातील किनारपट्टी भागापासून ते पश्चिम बंगालपर्यंत कमी दाबाचा पट्टा भूभागानजीक आला असून, झारखंड आणि नजीकच्या परिसरावर त्यामुळं परिणाम होताना दिसत आहे. त्यातच चक्राकार वाऱ्यांची स्थितीसुद्धा सक्रिय झाल्यामुळं मान्सूनचा हा पट्टा भारतातील कानपूर, वाराणासी, रोहतकच्या दिशेनं कूच करताना दिसत आहे. ज्यामुळं मध्य आणि उत्तर भारतासह पूर्वीय राज्यांमध्येही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तिथं दक्षिणेकडे केरळ, तेलंगणा, कर्नाटक इथं 2 ते 7 जुलैदरम्यान मुसळधार पावसाचा इशारा असून यादरम्यान दक्षिणी बेट समुह क्षेत्रांमध्ये ताशी 40 ते 50 किमी इतक्या वेगानं वारे वाहण्याची शक्यतासुद्धा हवामान विभागानं वर्तवली आहे.