Maharashtra Weather News : देशाच्या बहुतांश भागांमध्ये पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती झाली असून, त्यामुळं उत्तरेपासून ते अगदी दक्षणेपर्यंत पाऊस दमदार हजेरी लावताना दिसत आहे. महाराष्ट्रातसुद्धा पावसानं मुंबठई, उपनगरांसह कोकणालासुद्धा झोडपलं आहे. तर, विदर्भ आणि मराठवाडासुद्धा इथं अपवाद राहिलेले नाहीत. असा हा अविरत बरसणारा पाऊस काही अपवादात्मक जिल्ह्यांमध्ये थोडीथोडकी विश्रांती घेणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मात्र उर्वरित राज्यात कुठं रिपरिप तर कुठं या पावसाच्या सरींचा सणसणीत मारा मात्र सुरूच राहणार असल्याचा पुनरूच्चारही हवामान विभागानं केला आहे.
राज्यात प्रामुख्यानं कोकणासह घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी असेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवत त्या धर्तीवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूरसह रायगडसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. गुजरात ते केरळच्या उत्तरेकडील भागांमध्ये समांतर दिशेत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं त्याचा परिणाम राज्याच्या काही भागांमध्ये पावसाच्या हजेरीच्या स्वरुपात पाहता येत आहे.
हवामान विभागाच्या मुंबई केंद्रानं जारी केलेल्या माहितीनुसार उत्तर कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये आणि प्रामुख्यानं घाट क्षेत्रामध्ये पावसाचा तडाखा बसणार आहे. याशिवाय दक्षिण कोकण ते अगदी गोव्याच्या किनारपट्टीपर्यंतसुद्धा पावसाची चिन्हं स्पष्ट दिसत आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहणार असून, अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या जोरदार सरी वाहतूक कोंडी आणि तत्सम अडचणींमध्ये भर टाकताना दिसतील.
राज्याच्या काही भागांमध्ये श्रावणसरींना सुरूवात झाली असून मागील 24 तासांमध्ये मुंबईमध्येसुद्धा याची प्रचिती आली, जिथं अधूनमधून डोकावणारी सूर्यकिरणं आणि काळ्या ढगांची चादर चकवा देऊन जाताना दिसली. पूर्व विदर्भात रविवारी पावसाची रिपरिप सुरू होती. तर, अतिववृष्टीमुळं गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागात पूरस्थिती कायम असल्याचं पाहायला मिळालं.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the districts of North Konkan and ghat areas of Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 27, 2025
Heavy rainfall at very likely to occur at isolated places in the districts of South Konkan-Goa.
तिथं मराठवाड्यात श्रावणाच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार हजेरी लावत विभागातील आठही जिल्ह्यांना दणाणून सोडलं. पावसाची ही हजेरी आणखी काही दिवस कायम राहणार असून, धरण क्षेत्रांमध्येसुद्धा दिलासादायक पर्जन्यमान झाल्यानं राज्यातील अनेक भागांचा पाणीप्रश्न आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचं स्पष्ट होत आहे.