Maharashtra Weather Updates : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये मागील 24 तासांत पावसाची रिमझिम वगळता वातावरणात प्रचंड आर्द्रता जाणवली. ज्यामुळं तापमानाच काही अंशांची वाढ दिसून आली. उलटपक्षी राज्याच्या किनारपट्टी भागांमध्ये सोसाट्यांच्या वाऱ्यानं अडचणी निर्माण केल्या. हवामान विभागानं राज्यातील एकंदर स्थिती आणि मान्सूनचा वेग पाहता वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पुढचे 24 तास पावसाच्या जोरदार सरींची हजेरी असेल.
तिथं कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत समुद्री वादळी वाऱ्यांचा वेग वाढल्यानं पावसाची हजेरी आणि वाऱ्याचाच खेळ पाहायला मिळेल. राज्याच्या घाटमाथ्यावरील भागांमध्ये पावसाच्या ढगांची दाटी असेल तर, उर्वरित भागांमध्ये काही अंशी उघडीप असल्याचं पाहायला मिळेल. विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाचा जोर मंदारवणार असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे.
साधारण आठवड्याहून अधिक काळापासून पावसाचा वाढलेला जोर राज्यभरात दणका देताना दिसत आहे. मात्र आता हाच पाऊस थैमान घालत असला तरीही येत्या काळात तो मोठ्या सुट्टीवर जाण्याची चिन्हं आहेत. वाऱ्याची बदलती दिशा आणि समुद्रातील हवामानात सातत्यानं होणारे बदल पाहता पाऊस आता मोठी विश्रांती घेत थेट 15 ऑगस्टनंतर खऱ्या अर्थानं जोरदार हजेरी लावेल असं सांगितलं जात आहे.
Heavy to very heavy rainfall very likely to occur at isolated places in the ghat areas of North Madhya Maharashtra.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) July 28, 2025
Heavy rainfall at very likely to occur at isolated places in the districts of Goa, North Konkan , Ghat areas of South Madhya Maharashtra.
मुंबई आणि उपनगरांमध्ये आषाढाप्रमाणं कोसळणारा हा पाऊस आता खऱ्या अर्थानं श्रावणसरींची बरसात करताना दिसणार आहे. हवामान विभागानं जारी केलेल्या वृत्तानुसार येत्या किमान 7 ते 8 दिवसांमध्ये ऊन-पावसाचा खेळ पाहायला मिळणार आहे, तर अधुनमधून श्रावणसरींची बरसात सुखावून जाणार आहे.
15 ऑगस्टनंतरच पावसाचा जोर पश्चिम महाराष्ट्रासह राज्याच्या इतरही भागांमध्ये वाढणार असून यादरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला आहे. त्यामुळं तूर्तास या मोठ्या रजेवर जाण्याआधी पावसाची कुठं दमदार तर कुठं अगदी ओझरती हजेरी पाहायला मिळेल हे मात्र नक्की!