Maharashtra Weather News : मान्सूनच्या (Monsoon Predictions) वाऱ्यांचा वेग मंदावताच राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र गेल्या आठवड्याभरातील हा वाढलेला उकाडा आता टप्प्याटप्प्यानं कमी होणार असून, राज्यात पुन्हा एकदा पाऊस जोर धरताना दिसणार आहे असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळं यंदाच्या नारळी पौर्णिमेपासूनच (Rain Updates) पाऊस गाजणार आणि सणवार गाजवणार असं म्हणायला हरकत नाही.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी आयएमडीचा हवाला देत पुढील 4 दिवस, मराठवाड्यासह राज्याच्या बहुतांश भागांमध्ये मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता असल्याचं सांगितलं आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्येसुद्धा राज्याच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
पश्चिम महाराष्ट्रातसुद्धा घाटमाथ्यावर पावसाळी ढगांची दाटी असेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं असून, सातारा, सांगली, सोलापूर, रायगड या भागांमध्ये पावसाच्या सरींचा मारा नागरिकांना सहन करावा लागणार आहे. तर, तिथं नाशिक, जालना, परभणी, धाराशिव, लातूर इथंही पावसाच्या धर्तीवर हवामान विभागानं यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान निरीक्षणकर्त्यांच्या नोंदीनुसार पुढील काही दिवस राज्यामध्ये आकाश बहुतांशी ढगाळ राहणार असून विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल तर, काही भागांमध्ये वाऱ्याचा वेगही वाढलेला असेल असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सध्या तामिळनाडूच्या समुद्रकिनाऱ्यापासून चक्राकार वाऱ्यांची निर्मिती होत असल्या कारणानं कर्नाटकपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. परिणामस्वरुप राज्यात पावसासाठी पुन्हा एकदा पोषक वातावरणनिर्मिती होताना दिसणार आहे.
7 Aug, As per the IMD model guidance, पुढील ४ दिवस, मराठवाड्यात, महाराष्ट्रात मेघगर्जनेसह मध्यम पावसाची शक्यता. pic.twitter.com/QGhkWThUCQ
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 7, 2025
केंद्रीय हवामानशास्त्र विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील पर्वतीय भागांपासून ते मैदानी क्षेत्रापर्यंत सर्वदूर पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत असून, त्या धर्तीवर आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल, बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड यांसारख्या राज्यांमध्ये जोरदार पर्जन्यमानाचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेशसुद्धा इथं अपवाद राहणार नसून, या पर्वतीय राज्यांना भूस्खलनाचा धोका असल्याचा इशारा देत यंत्रणांनी स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना सतर्क केलं आहे.
महाराष्ट्रातील तापमानात वाढ का झाली?
मान्सूनच्या वाऱ्यांचा वेग मंदावल्याने राज्यातील कमाल आणि किमान तापमानात वाढ झाल्याचं दिसून आलं. मात्र, आता हा उकाडा टप्प्याटप्प्यानं कमी होणार आहे.
नारळी पौर्णिमेपासून पाऊस कसा असेल?
नारळी पौर्णिमेपासून पावसात वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागानुसार, पावसामुळे सणांचा आनंदही दुप्पट होण्याची अपेक्षा आहे.
कोणत्या जिल्ह्यांना पावसासाठी यलो अलर्ट?
पुढील 24 तासांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बीड या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, सोलापूर, रायगड आणि नाशिक, जालना, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांनाही यलो अलर्ट देण्यात आला आहे.