Maharashtra weather News: राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून बहुतांश भागांत फक्त हलक्या सरींच्या पावसाची नोंद होत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. मात्र, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान विभागाने विदर्भात पुढील 3 ते 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. यामध्ये भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये अधूनमधून हलक्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पावसाने विश्रांती घेतल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी तापमानात वाढ झाली आहे. नागपूरमध्ये शनिवारी 34 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली असून हे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. पावसाचा अभाव आणि वाढते तापमान यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर पावसाचे प्रमाण पुन्हा वाढले आहे. विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
विशेषतः कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी हवामानाच्या बदलांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कालावधीत काही ठिकाणी मुसळधार पावसाबरोबरच विजांचा कडकडाट आणि वाऱ्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी नवी मुंबई, ठाणे परिसरात आज हलक्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. कल्याण, पनवेल भागात इतर शहरांच्या तुलनेत पावसाचे प्रमाण जास्त असते. मात्र, आजच्या दिवशी या भागांमध्येही जोरदार पावसाची शक्यता कमी आहे.