Maharashtra Weather News : मुंबई, ठाणे, रायगड ते अगदी रत्नागिरीपर्यंत मागील काही दिवस पावसानं चांगलीच उसंत घेतल्यामुळं तापमानाच वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात घाटमाथा आणि विदर्भ वगळचा उर्वरित भागांमध्ये पावसाच्या हलक्या सरींनीच हजेरी लावली होती. आता मात्र हाच पाऊस पुन्हा एकदा हवामान प्रणालीत झालेल्या बदलांमुळं पुन्हा एकदा राज्याच्या काही भागांमध्ये जोर धरताना दिसत असून, परिणामस्वरुप मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या मध्यम ते मसुळधार सरींची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मान्सूनच्या वाऱ्याचा वेग कमी झाल्या कारणानं राज्यात पावसाचं प्रमाण कमी झालं. मात्र आता मध्यपूर्व अरबी समुद्रापासून पूर्व- पश्चिमेकडे हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असून, त्यामुळं राज्याच्या काही भागांवर पावसाळी ढगांचं सावट स्पष्टपणे पाहायला मिळत आहे.
हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणातीव दक्षिणेकडे असणाऱ्या जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्राच्या उत्तरेकडे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी असेल. ज्यादरम्यान वाऱ्याचा वेग वाढून ताशी 30 ते 40 किमी इतका असेल. तर, दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून ते अगदी मराठवाडा आणि गोव्यापर्यंतसुद्धा वादळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल असं हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
पुढील 24 तासांमध्ये राज्याच्या सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, भंडारा, गोंदिया इथं विजांच्या कडक़डाटासह पावसाची हजेरी असेल असं सांगत हवामान विभागानं या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. तर कोकणात पावसाचा जोर काही अंशी वाढेल असाही प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया.https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/894X4QTQZc
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 5, 2025
तूर्तास देशाच्या उत्तरेकडील पावसाचा आणि तत्सम हवामान स्थितीचा महाराष्ट्रावर थेट परिणाम दिसून येत नसला तरीही मध्य भारतातील राज्यांपर्यंत मात्र या नैसर्गिक बदलांचा परिणाम दिसून येत असून तिथं मात्र पावसाचा जोर वाढल्याचं स्पष्ट होत आहे.
महाराष्ट्रात सध्या हवामानाची स्थिती काय आहे?
सध्या महाराष्ट्रात हवामान प्रणालीत बदल झाल्याने पावसाचा जोर पुन्हा वाढत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाच्या सरींची शक्यता आहे.
कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे?
कोकणातील दक्षिणेकडील जिल्हे, मध्य महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग, मराठवाडा आणि गोवा येथे मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय, दक्षिण मध्य महाराष्ट्रातही वादळी पावसाचा अंदाज आहे.
पावसादरम्यान वाऱ्याचा वेग किती असेल?
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किलोमीटर इतका असेल.