Maharashtra Weather Update: जून महिन्यातच पावसाने ब्रेक घेतल्यामुळं उन्हाचा चटका तापदायक ठरू लागला आहे. अनेक जिल्ह्यातील कमाल तापमान चाळीशीपार पोहोचले आहे. विदर्भात उन्हामुळं काहिली होत आहे. असे असतानाच आज 11 जून रोजी मात्र सातारा, सांगली सह मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसंच उर्वरित राज्यात विजांसह पावसाचा अंदाज असल्याने यलो अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे.
विदर्भात काही जिल्ह्यात उन्हाचा चटका वाढत चालला आहे. नागपूर येथे राज्यातील उच्चांकी 44.2 अंश तापमानाची नोंद झाली आहे. तर मराठवाड्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. आज राज्यात विजांसह पावसाचा अंदाज कायम आहे. सातारा, सांगली, हिंगोली, नांदेड, जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता असल्याने तसंच, कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, धाराशिव, लातूर, विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, वाशीम,नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. त्यामुळं हवामान विभागाने आज दक्षतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुसळधार पावसासाठी आणखी तीन ते चार दिवसांची वाट पाहावी लागणार आहे. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान होत असल्याने 14 जूनपर्यंत मध्य भारत आणि पूर्व भारताच्या काही भागात मान्सूनची चाल होण्याची शक्यता आहे. त्यामुळं 14 जूनपर्यंत मान्सून पुन्हा परतण्याची शक्यता आहे.
प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13-16 June दरम्यान कोकणातील नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतात, ज्यामुळे नद्यांच्या काठावर गैरसोय होऊ शकते, कदाचित स्थानिक पूरामुळे पूल झाकले जाऊ शकतात, त्यामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. डोंगराळ उतारांवरून वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहामुळे घाट रस्त्यांवर तात्पुरता परिणाम होऊ शकतो.
विदर्भात अजूनही मान्सूनची प्रतीक्षा सुरू असून नागपुरात तर 43 अंश सेल्सिअस पर्यंत पारा पोहचला होता. त्यामुळे विदर्भात मान्सूनच्या प्रतीक्षेत अजून ही उन्हाचे चटके बसत बसत आहे. दरम्यान -बंगालच्या उपसागरात तयार होत असलेला कमी दाबाचा पट्टा हा 12 जून नंतर मान्सून विदर्भात घेऊन येऊ शकतो असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.