Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'फुले' चित्रपटासाठी आंबेडकर मैदानात, वाद कोणत्या वळणावर पोहोचणार?

Mahatma Jyotiba Phule Cinema Controversy: महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या ऐतिहासिक कार्यावर आधारित फुले या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झालाय. 

'फुले' चित्रपटासाठी आंबेडकर मैदानात, वाद कोणत्या वळणावर पोहोचणार?

Mahatma Jyotiba Phule Cinema Controversy: महात्मा ज्योतिबा फुलेंच्या आयुष्यावर आधारीत फुले या सिनेमाच्या काही दृश्यांवर ब्राम्हण महासंघानं आक्षेप घेतला. त्यानंतर सेन्सॉर बोर्डानं सिनेमातील काही दृश्यांवर कात्री लावली. आता याविरोधात थेट प्रकाश आंबेडकर मैदानात उतरलेत. फुले सिनेमावरुन सुरु झालेला वाद कोणत्या वळणावर पोहोचलाय.

महात्मा ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुलेंच्या ऐतिहासिक कार्यावर आधारित फुले या सिनेमावरुन मोठा वाद निर्माण झालाय. ब्राम्हण महासंघाच्या आक्षेपानंतर सेन्सॉर बोर्डानं यातल्या काही दृश्यांना कात्री लावल्यावर आता फुले सिनेमासाठी थेट आंबेडकर मैदानात उतरलेत. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील फुले वाडासमोरच आंदोलन केलं. चित्रपटावरुन अजूनही जातीयवाद सुरु असल्याचा आरोप आंबेडकरांनी केला.  खरंतर महात्मा फुलेंच्या जयंतीला म्हणजे आज होणारा हा चित्रपट आता किमान 2 आठवडे लांबणीवर पडलाय. या चित्रपटावरुन नेमका काय वाद झालाय? जाणून घेऊया 

'फुले' चित्रपटावरुन वादाची मालिका सुरु झालीय. फुले चित्रपटातील काही दृश्यांना ब्राह्मण महासंघाने आक्षेप घेतलाय. ब्राह्मण समाजाचं कलंकित चित्रण केल्याचा आनंद दवेंचा आरोप आहे. फुलेंच्या समाजसुधारणेत मदत केलेल्या ब्राह्मणांकडे दुर्लक्ष झाल्याचे दवेंचा आरोप आहे. सेन्सॉर बोर्डाकडून काही कथित जातीयवादी दृश्यांना कात्री लावावी, असे म्हणतअनेक दृश्य, संवादात बदल करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. खासकरुन जाती व्यवस्थेवरील व्हाईसओव्हरचा भाग हटवण्याचे आदेश देण्यात आले. 

आता प्रकाश आंबेडकरांपाठोपाठ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीवरुन सरकारलाही धारेवर धरलंय.  फुले हयात असताना पाखंडी लोकांनी विरोध केला होता, आजही काही पाखंडी लोक आहेत असं म्हणत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही चित्रपटासाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिलाय. 

फुले चित्रपटावरुन सुरु झालेल्या या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सावध पवित्रा घेतला. चित्रपटातून समाजावर काही परिणाम होईल का याची शहानिशा केली जाते असं म्हणत त्यांनी सेन्सॉर बोर्डाची पाठराखण केलीय. 

ऐतिहासिक सिनेमे आणि वाद हे समिकरण मागच्या अनेक वर्षांपासून ठरलेलं आहे. त्याला फुले सिनेमाही अपवाद ठरला नाही. मात्र फुले असो किंवा इतर ऐतिहासिक चित्रपट, जात, समाज या पलिकडे जाऊन त्याकाळतला खरा इतिहास बघणं, तो स्विकारणं, आणि त्यानुसार बदल करणं लोकांकडून अपेक्षित आहे. आता फुलेसाठी आंबेडकर मैदानात उतरल्यानंतर या वादावर पडदा पडतो की वादाला नवी फोडणी मिळते हे बघावं लागेल.

Read More