Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'85 व्या वर्षी कशाला निवडणूक लढायची? आता पायजमा...'; अजित पवारांचा BJP नेत्याला टोला

Ajit Pawar Malegaon Speech: अजित पवारांनी जाहीर भाषणामध्ये वयाचा उल्लेख करत टीका करताना स्वत: काय काय काम केलं आहे हे सांगितलं.

'85 व्या वर्षी कशाला निवडणूक लढायची? आता पायजमा...'; अजित पवारांचा BJP नेत्याला टोला

Ajit Pawar Malegaon Speech: माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाच्या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे रिंगणात आहेत. सोमवारी अजित पवारांनी बारामतीमध्ये अनेक ठिकाणी सभा घेऊन मतदारांशी संवाद साधला. त्यांनी नीरावागज येथील एका सभेत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यावर वयावरुन निशाणा साधला. आपल्याला मतदान करण्याचं आवाहन करतानाच अजित पवारांनी विरोधात उभ्या असलेल्या भाजपाचा नेता आणि माजी चेअरमनवर निशाणा साधला. 

संविधानाने अधिकार दिलाय मला: अजित पवार

"माझी चेअरमन कारकीर्द बारामतीकर यांना दाखवायची आहे. माझ्यावर मुख्यमंत्री व्हायला निघाला असा आरोप होतोय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाने उभा राहण्याचा अधिकार दिलाय मला," असं म्हणत अजित पवार यांनी आपल्या उमेदवारीची पाठराखण केली. पुढे बोलताना अजित पवारांनी माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष तसेच भाजपा नेते चंद्रराव तावरेंच्या नावाचा थेट उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरु असून या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या 'निळकंठेश्वर पॅनल' आणि चंद्रराव तावरेंच्या 'सहकार बचाव पॅनल'मध्ये थेट लढत आहे.

85 वय झाल्याची करुन दिली आठवण

"85 वर्ष वय झालंय आता. विसमरण होतंय," असं म्हणत अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्यावर नाव न घेता टीका केली. "इथेनॉल 5 रुपये कमी दराने विकण्याचा प्रयत्न झाला. तब्बल अडीच कोटी रुपये वाचले," असं म्हणत रंजन तावरे यांच्यावर अजित पवार यांनी भाषणातून गंभीर आरोप केला. "महाराष्ट्र राज्यात चांगल्या खरेदी विक्री संघ चालले आहेत त्यात बारामती खरेदी विक्री संघाचे नाव आहे," असं म्हणत अजित पवारांनी काम करुन दाखवण्याची इच्छा असल्याचं सूचित केलं. "माझ्या शब्दाला राज्यात किंमत आहे. बारामती एसटी स्टँड सारखे देशात एसटी स्टँड नाही," असं म्हणत अजित पवारांनी आपल्या कामांचा पाढा वाचून दाखवला. 

नक्की वाचा >> 'माझी बायको म्हणते कुठून याची इतकी...'; अजित पवारांच्या 'त्या' विधानानंतर पिकला एकच हशा, पाहा Video

पायजमा सोडला आणि लुंगी घातली

"(निवडणुकीला) उभं राहण्याचे अधिकार सर्वांना आहे. मात्र 85 वयात कशाला? विसमरण होतंय तब्येत साथ देत नाही. आता पायजमा सोडला आणि लुंगी घातली," अशी शा‍ब्दिक टोलवा टोलवी अजित पवार यांनी चंद्रराव तावरे यांच्या नावाचा थेट उल्लेख न करता केली. 

अजित पवारांकडून संस्थाचा गैरवापर होत असल्याचा आरोप 

माळेगाव साखर कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पत्रकारांशी संवाद साधताना तावरेंनी अजित पवारांवर टीका केलेली. शरद पवारांनी सांगितल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आम्ही मदत केल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार राजकारणात आले. मात्र आता ते निवडणुकीच्या काळात सहकारी संस्थांचा गैरवापर करत आहेत. त्यांच्या घरात अनेक कारखान्यांचे आणि विविध प्रशासकीय कर्मचारी आहेत. त्यांचा ते गैरवापर करतात, असा आरोप तावरेंनी केलेला. त्यालाच वयाचा मुद्दा उपस्थित करत अजित पवारांनी जाहीर भाषणातून उत्तर दिलं आहे.

Read More