MamaEarth Ghazal Alagh : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यावरुन भारत आणि मालदीवमध्ये संबंध ताणले गेले आहेत. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुन केलेल्या टीकेवरुन मालदीवच्या तीन मंत्र्यांना पदावरुन हटवण्यात देखील आलं होतं. त्यामुळे आता भारतीयांनी मालदीवला आणि तिथल्या पर्यटनाला विरोध सुरु केला आहे. दुसरीकडे भारताल्या नेतेमंडळींपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांना भारतीय पर्यटनाला महत्त्व देण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता मालदीवला विरोध करण्याच्या नादात मामाअर्थच्या सह-संस्थापक गझल अलघ या चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत.
भारत आणि मालदीवच्या वाढत्या तणावादरम्यान, मामाअर्थच्या सह-संस्थापक गझल अलघ यांनी भारतीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. मात्र त्यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अलघ यांनी त्यांच्या मुंबई ते नाशिक प्रवासादरम्यान हेलिकॉप्टरमधून घेतलेला एक व्हिडिओ शेअर केला आहे. काही नेटकऱ्यांनी मालदीवसोबत तुलना अनावश्यक असल्याचे म्हटलं आहे, तर काहींनी मालदीव वादावर भाष्य करण्यास तुला उशीर झाल्याचे म्हटलं आहे.
काय म्हणाल्या गझल अलघ?
"जर मी तुम्हाला सांगितले की मी आत्ता मालदीवमध्ये आहे, तर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवाल का? पण मी प्रत्यक्षात मुंबई ते नाशिकला हेलिकॉप्टरने जात आहे. आपण ज्या परदेशी देशांना भेट देऊ इच्छितो त्या देशांच्या बरोबरीने भारत आहे. आपल्याला फक्त ते अधिक एक्सप्लोर करण्याची आवश्यकता आहे," असे गझल अलघ यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.
If I told you I was in the Maldives right now, you'd believe me, right?
— Ghazal Alagh (@GhazalAlagh) January 16, 2024
But, I'm actually in a chopper from Mumbai to Nashik.
India really is no less than the foreign countries that we aspire to go to. We just need to explore it more. pic.twitter.com/h3t7sAdHN7
गझल अलघ यांनी ही पोस्ट केल्यापासून जवळपास आठ लाख लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच या व्हिडीओला जवळपास 1,900 लाईक्स मिळाले आहेत. गझल अलघ यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. मी मालदीवला गेलो आहे. हे सुंदर आहे पण मालदीवशी प्रत्येक गोष्टीची तुलना करू नका. उशीर झाला गझल, ट्रेंड आता दुसरीकडे वळला आहे. हे कोणत्याही क्षणी मालदीवसारखे दिसत नाही, अशा तिखट प्रतिक्रिया दिल्या आहे.
एका नेटकऱ्याने या बाबतीत मालदीव, लक्षद्वीप किंवा कोणत्याही बेटांसारखे दिसत नाही, असे म्हटलं आहे. तर दुसऱ्या एका युजरने, मी मालदीवला गेलो आहे आणि ते मालदीवच्या अगदी जवळ जाणारं आहे यावर माझा विश्वास बसणार नाही. हे सुंदर आहे पण मालदीवशी प्रत्येक गोष्टीची तुलना करू नका, असं म्हटलं आहे. आणखी एका युजरने अचानक प्रत्येकाला भारत सुंदर दिसत आहे, असं म्हटलं आहे.
तुमचे इंडिगो फ्लाइट रद्द झाल्यामुळे तुम्ही हेलिकॉप्टर घेतल्याचे लिहिले असते तर हे ट्विट अधिक व्हायरल झाले असते. मालदीवचा ट्रेंड जुना आहे. या आठवड्यासाठी नवीन ट्रेंडमध्ये सामील व्हा, असेही एकाने म्हटलं आहे.