Pune Crime News: राज्यात सध्या आत्याचार, गुन्हेगारीच्या आणि आत्महत्यांच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. विशेषतः विवाहित महिलांमध्ये विविध कारणांमुळे टोकाचं पाऊल उचलण्याच्या घटना चिंताजनक पद्धतीने समोर येत आहेत. अशाच प्रकारची एक हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील फुरसूंगी येथे घडली आहे. पती आणि सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या छळाला कंटाळून एका तरुण विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवलं.
मृत महिलेचं नाव सीमा अक्षय राखपसरे (वय 24) असं असून तिचा पती अक्षय सुरेश राखपसरे, सासू आशाबाई सुरेश राखपसरे, चुलत सासरे आणि इतरांवर फुरसूंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार रवि खलसे (वय 50) यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी 6 ऑगस्ट रोजी घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीमाचा विवाह काही महिन्यांपूर्वीच अक्षय राखपसरे याच्याशी झाला होता. लग्नानंतर ती पती व सासरच्या मंडळीसोबत राचंदवाडी, फुरसूंगी येथे राहत होती. या काळात सीमाला माहेरहून पैसे आणण्यासाठी दबाव टाकण्यात येत होता. तिला वारंवार टोचून बोलणे, मानसिक छळ आणि शारीरिक अत्याचार होत असल्याचे समोर आले आहे. अखेर या सततच्या त्रासाला कंटाळून 6 ऑगस्ट रोजी सीमाने राहत्या घरात पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
तर दुसरीकडे पुण्यातील ससून रुग्णालयाच्या बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी 5 ऑगस्ट रोजी रात्री हा प्रकार घडला. मृत विद्यार्थिनीचे नाव ज्योती कृष्णकुमार मीना वय 23 असून ती राजस्थानमधील आहे.
याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येपूर्वी ज्योतीने एक सुसाईड नोट लिहिली होती, ज्यामध्ये तिने आपल्या आई-वडिलांना उद्देशून 'मला शिकायचं आहे, पण माझ्याकडून होत नाही. मला माफ करा असे लिहिले होते.
तिचा भाऊ राजस्थानहून पुण्यात आल्यानंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीवर मानसिक आजारासाठी मानसोपचार तज्ञांकडून उपचार सुरू होते. ती नियमित औषधोपचार घेत होती. आठवीत असतानाच तिला मानसिक त्रास सुरू झाला होता. काही दिवसांपूर्वी तिने टक्कल केले होते अशी माहितीही समोर आली आहे.
FAQ
फुरसूंगी येथील आत्महत्येची घटना कधी आणि कुठे घडली?
ही घटना 6 ऑगस्ट 2025 रोजी पुणे जिल्ह्यातील फुरसूंगी येथील राचंदवाडी परिसरात घडली.
सीमाने आत्महत्या का केली?
सीमाला पती आणि सासरच्या मंडळींकडून पैशांसाठी दबाव, टोचून बोलणे, मानसिक छळ आणि शारीरिक अत्याचार होत असल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ज्योतीच्या सुसाईड नोटमध्ये काय लिहिले होते?
ज्योतीने लिहिले की, "मला शिकायचं आहे, पण माझ्याकडून होत नाही. मला माफ करा."