Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

भिवंडी मेट्रो अपघात: रॉड डोक्यात घुसलेल्या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक! कोर्टाने स्वत: घेतली दखल; संतापून म्हणाले...

Metro Accident Bhiwandi: मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी लागणारा लोखंडी राॅड रिक्षात बसलेल्या सोनू अली याच्या डोक्यात शिरला. या अपघातात हा 22 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

भिवंडी मेट्रो अपघात: रॉड डोक्यात घुसलेल्या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक! कोर्टाने स्वत: घेतली दखल; संतापून म्हणाले...

Metro Accident Bhiwandi: ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो- 5 च्या बांधकामस्थळी दोन दिवसांपूर्वी एक लोखंडी रॉड रिक्षावर पडून त्यातील प्रवासी गंभीररीत्या जखमी झाल्याच्या घटनेची उच्च न्यायालयाने गुरुवारी स्वतःहून दखल घेतली. तसेच, सुरक्षा नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश देऊनही त्या अभावी वारंवार होणाऱ्या अशा अपघातांबाबत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. या घटनेच्या निमित्ताने बहुमजली इमारतींच्या बांधकामस्थळांवरील सुरक्षा त्रुटींबाबत दाखल केलेली याचिकाही न्यायालयाने यावेळी पूर्ववत केली.

न्यायालयाने काय म्हटलंय?

वरळी येथे दोन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या 52 व्या मजल्यावरून एक मोठा सिमेंट ब्लॉक पडला होता आणि या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला होता. या घटनेच्या अनुषंगाने मार्च 2023 मध्ये याचिका दाखल झाली होती. न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठाने 5 ऑगस्ट रोजी घडलेल्या अपघाताच्या निमित्ताने ही याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेण्याचे स्पष्ट केले. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र, समितीच्या शिफारशी सर्व नियोजन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आल्या नाहीत याबाबतही न्यायालयाने संताप व्यक्त केला.

5 ऑगस्टला नेमकं घडलं काय?

सोनू अली रमजान अली शेख (22) असे जखमी मुलाचे नाव आहे. तो मंगळवारी दुपारी धामणकर नाका येथून विठ्ठल नगरच्या दिशेने रिक्षातून प्रवास करत होता. भिवंडी येथे ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो पाच प्रकल्पाच्या निर्माणाचे काम सुरू आहे. मेट्रो मार्गिकेच्या कामासाठी लागणारा लोखंडी राॅड रिक्षात बसलेल्या सोनू अली याच्या डोक्यात शिरला. या घटनेनंतर सोनू याला स्थानिकांनी तात्काळ एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सोनूवर रुग्णालयात उपचार सुरु असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती डाॅक्टरांनी दिली. त्याच्या डोक्यात दोन ते तीन इंच राॅड आत गेल्याचेही डाॅक्टर म्हणाले. त्याच्यावर मंगळवारी रात्री शस्त्रक्रिया देखील पार पडली. शस्रक्रीयेनंतरही गंभीर जखमी असलेल्या या प्रवाशाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येत आहे.

एमएमआरडीएने घटनेनंतर काय म्हटलं?

एमएमआरडीएने या घटनेनंतर स्पष्टीकरण दिले आहे. घटनेची माहिती मिळताच, दोन्ही कंत्राटदार कंपन्यांचे अधिकारी वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी रुग्णालयात दाखल झाले. मेसर्स अफकॉन्सना सर्व वैद्यकीय खर्च उचलण्याचे आणि जखमी तरुणाला आवश्यक ती मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. जबाबदार असलेल्या मेसर्स अफकॉन्स कंपनीच्या कंत्राटदारावर 50 लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. तर, मेसर्स सिस्ट्रा-सीईजी-सिस्ट्रा (इंडिया) कंपनीला पर्यवेक्षी त्रुटींसाठी पाच लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याचेही एमएमआरडीए विभागाकडून सांगण्यात आले आहे.

कोणी दाखल केला गुन्हा?

या घटनेनंतर सोनू शेख याच्यासोबतच्या प्रवाशाने भोईवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 125 अ, ब प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mohd Qadir (@qadir7044)

याच मार्गावर यापूर्वीही झालेत असे अपघात, कधी अन् कुठे घडले अपघात?

घोडबंदर येथील तत्वज्ञान विद्यापीठ परिसरात मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान 30 जुलैला मोटारीवर राॅड पडला होता. या घटनेत वाहन चालक थोडक्यात बचावला. याच भागात 2 मे या दिवशी देखील असाच प्रकार उघड झाला होता. एका मोटारीवर क्रेनचा भाग कोसळला होता. त्यामुळे निष्काळजीची मालिका सुरु असल्याचे चित्र आहे.

FAQ

1. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो-5 च्या बांधकामस्थळी काय घडले?
5 ऑगस्ट 2025 रोजी भिवंडी येथील धामणकर नाका परिसरात मेट्रो-5 च्या बांधकामादरम्यान एक लोखंडी रॉड रिक्षात बसलेल्या प्रवासी सोनू अली रमजान अली शेख (22) याच्या डोक्यात शिरला. यामुळे तो गंभीर जखमी झाला आणि त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

2. या घटनेनंतर उच्च न्यायालयाने काय कारवाई केली?
उच्च न्यायालयाने या घटनेची स्वतःहून दखल घेतली आणि सुरक्षा नियमांचे पालन न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेच, बांधकामस्थळांवरील सुरक्षा त्रुटींबाबत यापूर्वी दाखल केलेली याचिका पुन्हा सुनावणीसाठी घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाने सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांसाठी स्थापन केलेल्या समितीच्या शिफारशी नियोजन अधिकाऱ्यांपर्यंत न पोहोचल्याबद्दलही संताप व्यक्त केला.

3. जखमी व्यक्तीची सध्याची स्थिती काय आहे?
सोनू अली याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याच्या डोक्यात लोखंडी रॉड 2-3 इंच आत शिरला असून, मंगळवारी रात्री त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली. तरीही त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

 

Read More