MH 59 New RTO Number In Maharashtra : महाराष्ट्रातील शहरांचा झपाट्याने विकास होत आहे. शहरांसह तालुक्यांचा देखील विकास होत आहे. यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यांतील तालुक्यांमध्ये वाहनांची सख्या देखील वाढत आहे. यामुळे महाराष्ट्रात नविन परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर केले जात आहेत. या अंतर्गत आता महाराष्ट्रातील एका तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. MH 59 असा हा RTO क्रमांक आहे. जाणून घेऊया कोणत्या तालुक्याला हा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. 1 मार्च 2025 रोजी राज्यातील 58 वे उपप्रदेशिक परिवहन कार्यालय मीरा-भाईंदर येथे मंजूर करण्यात आले.
महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला नवा RTO क्रमांक मिळाला आहे. सांगली जिल्ह्याचा RTO क्रमांक हा MH 10 असा आहे. तर, आता सांगली जिल्ह्यातील जत तालुक्याला MH 59 असा नवा RTO क्रमांक मिळाला आहे. एमएच ५९ (MH 59) अशी आता जत तालुक्याची नवी ओळख असणार आहे. जतसाठी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय मंजूर झाले आहे. त्यानुसार MH 59 म्हणून जत तालुक्याला नवी ओळख मिळाली आहे. त्यामुळे जत तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, अनुज्ञप्ती (परवाने), करभरणा यासाठी आता इतर ठिकाणी जाण्याची गरज राहणार नाही.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी नविन RTO ची मागणी केली होती. जत तालुक्यातील नागरिकांना वाहनाच्या संदर्भात नोंदणी तसेच ड्रायव्हिंग लायसन्स यासह इतर कामाकरिता सांगली येथे जावे लागत होते. यामुळे वाहनधारकांची मोठी गैरसोय होत होती.
जत तालुक्याच्या नवीन RTO साठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्र्यांनी जतला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय स्थापन करण्याचे मान्य केले होते. त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीत नव्याने उपप्रादेशिक कार्यालय मंजूर करण्याबाबत आश्वासन दिले होते. या आश्वासनाची पूर्तता झाली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करत पडळकरांनी आभार मानले.