Biggest Redevelopment Project In South Mumbai: दक्षिण मुंबईतील कामाठीपुराचा रखडलेला पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. 'म्हाडा'च्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून कन्स्ट्रक्शन अॅण्ड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी गुरुवारी निविदा जाहीर करण्यात आली. पुनर्विकासातून 8001 रहिवाशांना प्रत्येकी 500 चौरस फुटांचे हक्काचे घर मिळणार आहे.
दक्षिण मुंबईतील 34 एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक 1 ते 15 या गल्ल्यांमध्ये सुमारे 943 उपकरप्राप्त इमारती आहेत. यामध्ये सुमारे 662 निवासी व 1376 अनिवासी असे एकूण 8001 रहिवासी वास्तव्यास असून 800 जमीनमालक आहेत. या क्षेत्रातील इमारती 100 वर्षे जुन्या आहेत. तसेच संपूर्ण भागातील भूखंडाचे निव्वळ क्षेत्रफळ सुमारे ७३,१४४.८४ चौरस मीटर आहे. या क्षेत्रातील इमारतींचे भूखंड हे अत्यंत छोट्या आकाराचे व अरुंद असल्यामुळे समूह पुनर्विकास केला जाणार आहे.
कामाठीपुरातील जमीनमालकांना मोबदला देण्यात येणार आहे. 50 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुटांचे 1 घर, 51 ते 100 चौ.मी. क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 2 घरे, 101 ते 150 चौ. मी. क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 3 घरे, 151 ते 200 चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाकरिता 500 चौ. फुटांची 4 घरे, 200 चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडाच्या पुढील प्रत्येक 50 चौ. मी. भूखंड क्षेत्रफळाकरिता 500 चौ. फुटांची 1 अतिरिक्त सदनिका मिळेल.
नक्की वाचा >> Mumbai Redevelopment Project: 180 फुटांच्या बदल्यात मिळणार 450 चौरस फुटांचे घर; 984 कुटुंबांना लागली खरी लॉटरी
या प्रकल्पाद्वासाठी, निवडलेल्या विकासकाकडून म्हाडाला 44 हजार चौरस मीटर क्षेत्र उपलब्ध करून दिले जाईल. त्यामुळे म्हाडाकडे मुंबईच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार आहेत. त्याचवेळी, विकासकाला 5 लाख 67 चौरस मीटर क्षेत्रफळ मिळणार आहे. एवढ्या भागात सुमारे 4500 नवीन फ्लॅट बांधले जाऊ शकतील अशी अपेक्षा आहे.
कामाठीपुराचा समूह पुनर्विकास म्हाडातर्फे विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली 2034, विनियम 33 (9) अंतर्गत करण्यात येणार आहे. त्यानुसार प्रकल्पाच्या आराखड्यासाठी निविदा मागवून मेसर्स माहीमतुरा कन्स्लटन्ट यांची नियुक्ती करण्यात आली. या माध्यमातून रहिवाशांना मोठ्या घरांसोबत कमर्शिअल इमारत, मनोरंजनाचे मैदान यासारख्या सुविधादेखील मिळणार आहेत.