MHADA Konkan Board Lottery 2025: राज्यातील आमदार, खासदारांसाठी राखीव असलेल्या म्हाडाच्या घराची किंमत सर्वसामान्यांना ज्या किंमतीत मिळणार आहे त्याच्या पाचपट किंमत मोजावी लागणार आहे. आमदार आणि खासदारांना अवघ्या साडेनऊ लाख रुपयांमध्ये मिळणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजारांहून अधिक घरांची लॉटरी जाहीर केली आहे. त्यात नियमानुसार वेगवगेळ्या राखीव गटांप्रमाणेच आमदार, खासदारांसाठी 95 राखीव घरे ठेवली आहेत. त्यात कल्याणमधील एका घराचा समावेश असून, त्याची किंमत केवळ नऊ लाख 55 हजार 800 रुपये एवढी आहे.
साडेनऊ लाखांना मिळणारं हे घर अत्यल्प उत्पन्न गटातील असून ते आजी-माजी आमदार-खासदारांसाठी राखीव आहे. त्यामुळे अत्यल्प उत्पन्न गटातील आमदार-खासदार कोण, या घरासाठी कोण अर्ज करणार, कोण विजेता ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाने पाच हजार 285 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर केली आहे. अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी ही घरे आहे.
आमदारांचं मूळ वेतन 1 लाख 82 हजार 200 रुपये इतकं आहे. त्यांना महागाई भत्ता म्हणून वेतनाच्या 28 टक्के रक्कम मिळते. म्हणजेच महागाई भत्ता 52 हजार रुपये इतका पडतो. म्हणजेच त्यांचा एकूण पगार 2 लाख 61 हजार 216 रुपये इतका मिळतो.
विशेष म्हणजे लाखो रुपये कमवणाऱ्या आमदारांना अवघ्या साडेनऊ लाखांना घर दिलं जाणार असतानाही सर्वसामान्यांना मात्र त्याच्या पाचपट रक्कम म्हाडाच्या घरांसाठी भरावी लागणार आहे. सर्वसामान्यांसाठी ही घरं 35 ते 50 लाखांच्या घरात आहेत. म्हणजेच 45 लाखांचं घर हे आमदाराच्या घराच्या पाचपट असणार आहे.
नक्की वाचा >> ...तर बसेल मोठा आर्थिक फटका; MHADA चा 5285 घरांच्या लॉटरीच्या सुरुवातीलाच इशारा! एकदा वाचाच
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (50 टक्के परवडणार्या सदनिका) 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
कोकण विभागातील 5 हजार 285 घरांच्या लॉटरीसाठीची अर्ज प्रक्रिया सोमवारी, 14 जुलैपासून सुरु झाली आहे. 13 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक 14 ऑगस्ट, 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक 1 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.