MHADA Konkan Board Lottery 2025: मुंबई तसेच मुंबई उपनगरांमध्ये स्वत:चं हक्काचं घर घेऊन पाहण्यांचं स्वप्न 'म्हाडा'च्या माध्यमातून पूर्ण होणार आहे. कोकण मंडळाच्या 5 हजार 285 घरांच्या लॉटरीसाठीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेची सुरुवात सोमवारीपासून सुरु झाली आहे. महिनाभर ही अर्ज प्रक्रिया सुरु राहणार आहे. मात्र स्वस्त घराच्या नादात सर्वसामान्यांना गंडा घातला जाण्याची शक्यताही 'म्हाडा'ने व्यक्त करत एक सूचक इशारा दिला आहे.
सदर सोडतीसाठी दि. 13 ऑगस्ट, 2025 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याची मुदत आहे. दिनांक 14 ऑगस्ट, 2025 रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्जदार अनामत रकमेचा भरणा ऑनलाईन करू शकतील. सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदार या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जातील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी 21 ऑगस्ट, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या दावे व हरकती नोंदविता येणार आहेत. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी दिनांक 1 सप्टेंबर, 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता 'म्हाडा'च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता सुनील नन्नावरे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील.
म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याकरिता अधिकृत वेबसाइट असून, या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत वेबसाइटवर अर्जदारांनी लॉटरीत सहभाग घेऊ नये. कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले. म्हाडा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे रोख रकमेची मागणी केली जात नाही, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे दलालाच्या प्रलोभनांना बळी पडू नये. फसवणुकीस म्हाडा जबाबदार राहणार नाही, असं म्हाडा कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी सांगितलं.
कोकण मंडळातर्फे मोठ्या संख्येने सदनिका आणि भूखंड उपलब्ध केले आहेत. मुंबईच्या जवळच घरे असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या सोडत प्रणालीमध्ये सहभाग घ्यावा. म्हाडाच्या संगणकीय सोडतीकरिता वापरण्यात येणारी संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आहे, असे संजीव जयस्वाल म्हणाले.
रेवती गायकर यांनी सोडतीत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांना आवाहन केले आहे की, नूतन संगणकीय सोडत प्रणाली ही संपूर्णतः ऑनलाईन व पारदर्शक असून यामध्ये कोणत्याही प्रकारे मानवीय हस्तक्षेपास वाव नाही. शिवाय या सदनिकांच्या विक्रीकरिता मंडळाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे अर्जदाराने कोणत्याही त्रयस्थ /दलाल/ मध्यस्थ व्यक्तीच्या प्रलोभनांना बळी पडू नये. तसेच अशा प्रकारच्या गैरव्यवहारास अथवा फसवणुकीस कोंकण मंडळ अथवा म्हाडा जबाबदार राहणार नाही. तसेच त्यांनी आवाहन केले आहे की सोडत प्रक्रियेमध्ये म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरून सहभाग घ्यावा.
कोकण मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेली ही सोडत पाच घटकांमध्ये विभागण्यात आली आहे. 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण 565 सदनिका, 15 टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत 3002 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत 1677 सदनिका, म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (50 टक्के परवडणार्या सदनिका) 41 सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. तसेच म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत 77 भूखंड विक्रीसाठी उपलब्ध आहेत.