MHADA Lottery : घर खरेदी करत असताना ते प्रशस्त हवं, खिशाला परवडणारं हवं, घराची वास्तू प्रसन्न असावी, पुरेसा सूर्यप्रकाश हवा अशा एक ना अनेक अपेक्षा असतात. थोडक्यात मनाजोगं घर खरेदी करणं ही सोपी बाब नाही. पण, म्हाडानं ही बाब सोपी करण्यासाठी तुमची मदत करण्याचा निर्णय घेतल्यानं घराच्या शोधात सुरू असणारी वणवण मात्र आता थांबणार आहे. कशी? पाहा....
म्हाडा (MHADA Lottery) च्या पुणे मंडळाकडून आधीच्या काही सोडतीतून शिल्लक असलेल्या घरांच्या विक्रीसाठी एक उपक्रम राबवण्यात येत असून, त्याअंतर्गत घरासाठी इच्छुक असणाऱ्यांना प्रथम येणाऱ्या प्राधान्य या तत्वावर घर उपलब्ध करून दिलं डाणार आहे.
घर विक्रीची ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी म्हाडानं या परवडणाऱ्या घरासाठीची नोंदणी ऑनलाईन पद्धतीनं सुरू केली असून, या नोंदणीचा पहिला टप्पा 10 एप्रिल 2025 पासून सुरू झाला आहे. तर, पुढील टप्पा 15 एप्रिलपासुन सुरू होणार आहे. या घरांसाठी इच्छुक असणाऱ्यांनी https://lottery.mhada.gov.in/OnlineApplication/Pune या म्हाडाच्या संकेतस्थळावर भेट द्यावी.
या योजनेमध्ये म्हाडानं नेमकी किती घरं उपलब्ध केली आहेत याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही. मात्र इच्छुकांना त्यांच्या आवडीच्या घराच्या नोंदणीसाठी प्राथमिक स्वरुपात अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ज्यानंतर घर निवडल्यानंतर 48 तासांच्या आत अडमिनिस्ट्रेटीव्ह फी भरणं अपेक्षित असेल. रक्कम भरल्यानंतर ऑनलाईन पद्धतीनंच या प्रक्रियेची Confirmation Update तुम्हाला मिळेल.
म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत घर घेण्याची संधी ज्या इच्छुकांनी गमावली त्यांच्यासाठी ही सोडत अतिशय महत्त्वाची ठरणार असून, या माध्यमातून पुण्यात घरांची उपलब्धता करून देण्याचा मुख्य हेतू म्हाडा साध्य करत आहे. शिवाय पुण्यासारख्या महत्त्वाच्या भागात घर घेण्याचं सामान्यांचं स्वप्नही यामुळं साकार होण्यास मोठा हातभार लागणार आहे हे नाकारता येत नाही.