Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'मी हिंदीतच बोलणार', म्हणणाऱ्या रिक्षाचालकाला शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप; परप्रांतीयाची मागायला लावली माफी

विरार रेल्वे स्थानकाबाहेर मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी परप्रांतीय रिक्षाचालकाला चोप दिला आहे.   

'मी हिंदीतच बोलणार', म्हणणाऱ्या रिक्षाचालकाला शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप; परप्रांतीयाची मागायला लावली माफी

मराठीच्या मुद्द्यावरुन उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरारमध्ये परप्रांतीय रिक्षाचालकाला बेदम मारहाण केली आहे. काही दिवसांपूर्वी रिक्षाचालकाचा भावेश पडोलिया नावाच्या व्यक्तीशी वाद झाला होता. विशेष म्हणजे भावेश पडोलिया हा स्वत: परप्रांतीय आहे. त्यांच्यातीव वादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ज्यानंतर शिवसेना आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिला. 

व्हिडीओत रिक्षाचालकाला 'मराठीत का बोलत नाही?' असं विचारल्यानंतर 'मी फक्त हिंदीत बोलणार,' असं बोलतान दिसत आहे. भावेश पडोलिया यांच्या दाव्यानुसार, त्यांनी रिक्षाचालकाला सार्वजनिक ठिकाणी मराठीचा वापर का करत नाही अशी विचारणा केली होती. त्यावर रिक्षाचालकाने त्यांना फक्त हिंदी किंवा भोजपुरीत बोलणार असं उत्तर दिलं. 

शनिवारी रिक्षाचालकाला शिवसेना (उद्धव ठाकरे) आणि मनसेच्या कार्यकर्त्यांनी विरार रेल्वे स्थानकाबाहेर घेरलं. शिवसेना-मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओदेखील समोर आला आहे, ज्यामध्ये त्याला अनेकदा कानाखाली मारली जात असल्याचं दिसत आहे. कानाखाली मारणाऱ्यांमध्ये महिलादेखील होत्या. यानंतर त्याला भावेश पडोलिया, त्यांची बहीण आणि राज्य सरकारची माफी मागण्यास भाग पाडण्यात आलं. मराठी भाषा आणि संस्कृतीचा अपमान केल्याचं सांगत त्याला माफी मागण्यास सांगण्यात आलं. 

शिवसेनेचे विरार शहर प्रमुख उदय जाधव यांनी आम्ही त्यांच्याच शैलीत उत्तर दिल्याचं म्हटलं आहे. "जर कोणी मराठी भाषा, महाराष्ट्र किंवा मराठी लोकांचा अपमान करण्याचं धाडस केलं तर त्यांना खऱ्या शिवसेना शैलीत उत्तर दिलं जाईल. आम्ही गप्प बसणार नाही," असं त्यांनी म्हटलं आहे. "महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल वाईट बोलण्याचे धाडस ड्रायव्हरमध्ये होते. त्याला योग्य धडा शिकवण्यात आला. आम्ही त्याला राज्यातील लोकांची आणि ज्यांच्यावर त्याने नाराजी व्यक्त केली आहे त्यांची माफी मागण्यास भाग पाडले," असा इशाराही त्यांनी दिला आहे. 

अद्याप पोलीस तक्रार नाही

पालघर जिल्हा पोलिसांनी अद्याप अधिकृत गुन्हा दाखल केलेला नाही. "आम्ही व्हायरल व्हिडिओ पाहिला आहे आणि वस्तुस्थिती पडताळत आहोत, परंतु आतापर्यंत दोन्ही पक्षांकडून कोणतीही तक्रार आलेली नाही," असं पोलिसांनी सांगितल्याचं वृत्त पीटीआयने दिलं आहे. 

Read More