Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

आमदार संतोष बांगर यांचा मुजोरपणा, थेट मॅनेजरच्या कानशिलात लगावली, वाचा नेमकं घडलं काय... व्हिडीओ

शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा एकाला कानशिलात लगावतानाचा व्हिडीओ व्हायरल

आमदार संतोष बांगर यांचा मुजोरपणा, थेट मॅनेजरच्या कानशिलात लगावली, वाचा नेमकं घडलं काय... व्हिडीओ

गजानन देशमुख, झी मीडिया हिंगोली :  शिंदे गटामध्ये सर्वात शेवटी सामील झालेले वादग्रस्त आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कामगार विभागाच्या मध्यान्ह भोजन योजनेतील निकृष्ठ दर्जाच्या जेवणाचा बांगर यांनी भांडाफोड केला आहे. अन्नाची पाहणी करताना त्यांनी उपहारगृहाच्या मॅनेजरच्या कानशिलात लगावली आहे. (MLA Santosh Bangar Viral Video)

कामगार कल्याण मंडळाकडून असंघटीत कामगारांसाठी महाराष्ट्रात काही ठिकाणी मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली आहे. कामगारांना मध्यान्ह भोजन पुरवण्याची जबाबदारी खासगी कंत्राटदारांना देण्यात आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील लिंबाळा एमआयडीसी उपहारगृहाला संतोष बांगर यांनी भेट दिली त्यावेळी जेवणामध्ये आळ्या, करपलेल्या चपात्या आणि माशा आढळल्या. 

कामगारांना निकृष्ठ दर्जाचे अन्न दिलं जात असून यामध्ये आर्थिक स्वार्थ पाहिला जात असल्याचा आरोप संतोष बांगर यांनी केला आहे.  या कंत्राटदारांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. त्यासोबतच निकृष्ठ दर्जाचं जेवण देणाऱ्या कंत्राटदाराला हे काम मिळालं कसं?, याच्या चौकशीची मागणीही बांगर यांनी केली आहे. 

मेन्यूमध्ये कांदा, लोणचं, गूळही दाखवण्यात आला आहे. मात्र, कामगारांना फक्त करपलेल्या चपात्या, डाळ आणि भात दिली जात असल्याचं बांगर यांनी दाखवलं. व्यवस्थापकाला आणि कंत्राटदाराला या प्रकाराचा जाब विचारला, पण उडवाउडवीची उत्तरे मिळाल्यामुळे आमदार बांगर यांनी तिथे उपस्थित व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली. 

सतत कॅमेरे घेऊन फिरणाऱ्या आमदार संतोष बांगर यांना हातात कायदा घेण्याचे अधिकार कुणी दिला हाच खरा सवाल आहे, जेवण जर निकृष्ट दर्जाचे असेल तर जिल्ह्यात सक्षम यंत्रणा आहे, मग बांगर नेहमीच पोलखोलच्या नावाखाली सामन्यांमध्ये दहशत पसरवित आहेत. यापूर्वी काही दिवसांपूर्वी झालेल्या सभेमधून त्यांनी चिथावणीखोर भाषण केलं होतं.

दरम्यान, याधीही संतोष बांगर यांनी एका खाजगी डॉक्टरला फीच्या कारणातून धमकावल होतं. शासकीय रूग्णवाहिका चालकाला फोन करून सर्व रूग्णवाहिका  फुकुन देण्याची भाषा केली होती. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यात नक्की कायद्याचे राज्य आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

Read More