मुंबई : भाजप आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात दंड थोपटलेत. कृषी घोटाळ्यातील मुंडेंना मिळालेल्या क्लिनचिटविरोधात धस सुप्रिम कोर्टात जाण्याच्या तयारीत आहेत. तर दुसरीकडे कृषी विभागातील घोटाळ्याची एसआयटी चौकशी करण्याची मागणी धस यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलीय. तर धसांच्या कोर्टबाजीच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा माजी कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतलीय. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडेंचा निकटवर्तीय वाल्मिकला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप झाले. आणि त्यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.. तर धनंजय मुंडे कृषीमंत्री असताना कृषी खात्याच्या साहित्य खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप धनंजय मुंडे यांच्यावर करण्यात आला होता. या आरोपांमधून धनंजय मुंडे यांनी क्लिनचीट दिलीय. या क्लिनचीटनंतर मुंडे हे मंत्रिमंडळात पुन्हा येतील अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र आता भाजप आमदार सुरेश धस यांना मुंडेंविरोधात दंड थोपटत सुप्रिम कोर्टात आव्हान देणार असल्याचं म्हटलंय.. धनंजय मुंडेंना क्लिन चीट कोणत्या अहवालाच्या आधारे दिली? असा सवालही धस यांनी कृषी सचिवांना केलाय. तर कृषी साहित्य खरेदीत घोटाळा झाला नाही हे सांगणारा अहवाल उपलब्ध करून देण्याची मागणीही धस यांनी केलीय.
तर दुसरीकडे कृषी विभागातील घोटाळ्याची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार धस यांनी मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीय. DBTचा निर्णय डावलून अनेक निर्णय झाले. 78 बोगस कंपन्यांमार्फत गैरव्यवहार झाल्याचा आरोप सुरेश धस यांनी मुंडेंवर पुन्हा एकदा केलाय.
दरम्यान या सगळ्या घोटाळ्यात वाल्मीक कराडचाही सहभाग होता. कारण खालच्या सर्व बैठका कराडच घेत होता असा आरोपही सुरेश धस यांनी केलाय. दरम्यान क्लिन चीट मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळ समावेशाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या होत्या. मात्र आता धस यांनी मुंडेंविरोधात दंड थोपटल्यानं मुंडेंच्या अचडणींमध्ये भर पडताना दिसतेय.