Thackeray Pawar Brand Raj Thackeray Reacts: सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा केला असून पुढील चार महिन्यामध्ये निवडणुका घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेपासून ते अगदी जिल्हा परिषदांपर्यंतच्या खोळंबलेल्या निवडणुका पुढील काही महिन्यांमध्ये पार पडणार हे निश्चित झालं आहे. याच पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष संभाव्य युती आणि आघाडीची चाचपणी करताना दिसत आहेत. अशातच दबक्या आवाजामध्ये पुन्हा एकदा दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का याबद्दलची चर्चा सुरु झाली आहे. तसेच राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष युतीसोबत जाणार की महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार याबद्दल संभ्रम कायम आहे. असं असतानाच आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी 'ठाकरे' आणि 'पवार' कुटुंबासंदर्भात मोठं विधान केलं आहे.
राज ठाकरेंनी शुक्रवारी पुण्यामधील एका विशेष कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी 'मुंबई तक'ला विशेष मुलाखत दिली. मुलाखतीमध्ये राज यांना 'ठाकरे' आणि 'पवार' ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न सुरु आहे का असा सवाल विचारण्यात आला. पत्रकार साहिल जोशी यांनी राज ठाकरेंची मुलाखत घेताना, "महाराष्ट्राच्या राजकारणात दोन नावं प्राकर्षाने घेतली जातात, ठाकरे आणि पावर! मात्र सध्यस्थितीमध्ये ठाकरे-पवार हे दोन्ही ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय का?" असा थेट प्रश्न विचारला. मागील काही वर्षांमध्ये राज्यातील नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या पक्षांची युती तसेच आघाडी या पार्श्वभूमीवर हा प्रश्न विचारण्यात आलेला.
राज यांनी या प्रश्नाला होकार्थी उत्तर दिलं. "संपवण्याचा प्रयत्न चालला आहे यात काही वाद नाही. निश्चितच," असं राज ठाकरे प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले. मात्र पुढे बोलताना राज ठाकरेंनी, "पण तो संपणार नाही. मी हे लिहून घ्यायला तयार आहे. तो संपणार नाही," असं आत्मविश्वासाने सांगताच उपस्थितांनी टाळ्या वाजवून राज यांच्या उत्तराला प्रतिसाद दिला.
"या सगळ्यामध्ये आमचे आजोबा येतात. महाराष्ट्रावर पहिला परिणाम जर म्हटला तर प्रबोधनकार ठाकरे. त्यानंतर बाळासाहेब ठाकरे आहेत. त्यांच्या बरोबरीने तुम्ही संगीत क्षेच्रात किंवा इतर क्षेत्रात पाहिलं तर माझे वडील श्रीकांत ठाकरे. त्यानंतर माझा (क्रमांक लागतो.) मी येतो, उद्धव येतो. प्रश्न अशा आहे की या साऱ्यामध्ये व्यक्ती येतातच पण आडनवा असतं. मला असं वाटतं की अडनाव हीच सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे," असं राज ठाकरे त्यांच्या कुटुंबातील प्रभावी व्यक्तींसंदर्भात आणि अडनावाच्या प्रभावाबद्दल म्हणाले.