MNS Shivsena Victory Rally Vijayi Melava: शासानानं हिंदी भाषेसंदर्भात रद्द केलेला शासन निर्णय आणि त्यानंतर ठाकरे बंधूंची यावर असणारी एकंदर भूमिका पाहता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यावर खिळलं आहे. त्याचसंदर्भात नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया आल्या असून, मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन यांनी झी 24तासशी संवाद साधताना ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली.
'राज ठाकरेंची आपल्या मनात प्रतिमा आहे. बाळासाहेब हयात असताना शिवसेना सोडायची त्यासाठी धाडस लागतं. आमच्या वयात अंतर असलं तरीही त्यांची एक प्रतिमा माझ्या मनात आहे. आम्ही मराठीचा आग्रह धरतो याचा अर्थ दुसऱ्या भाषेचा द्वेष करतो असं नाही', असं ते स्पष्टपणे म्हणाले.
'आज महाराष्ट्र राजकीय, वैचारिकदृष्ट्या गहाण पडल्याची भावना आहे. यातून राज्याला कोण बाहेर काढू शकतं तर ते ठाकरे बंधूच आहेत. आजही मी छातीठोकपणे सांगतो महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या संस्कृतीसाठी आणि मराठी भाषेसाठी ठाकरे बंधूंना हे उत्तरदायित्त्वं विसरता येणार नाही आणि जबबादारी विसरून ते दूर गेले तर ठाकरे बंधूंना काळ माफ करणार नाही' असंही महाजन जाहीरपणे स्पष्टपणे बोलले.
सरकारी पक्षाविषयी आज बोलायचच नाही, पण विरोधक समोर ठेवायचा नाही, विरोधकाला बोलू द्यायचं नाही, विरोधकाला विविध मार्गानं अडचणीत आणणं ही सत्ताधाऱ्यांची भूमिका असून हे लोकशाहीचं लक्षण नाही असं महाजन स्पष्टपणे म्हणाले.
'वर नरेंद्र, खाली देवेंद्र, पक्षात रविंद्र आणि विचार इतके दरिद्र्य? कसं काय? विचारच प्रगल्भ ठेवा ना...' असा सणसणीत टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला. राजकारणाच्या खालावलेल्या स्तरावर त्यांनी टीका केली. फक्त आपण नव्हे तर, शेकडो मराठी माणसांना हे कोण करु शकतं असा प्रश्न पडला असता 'ठाकरे' हेच नाव पुढे येतं असं सांगत त्यांनी ठाकरी बाण्याचं सामर्थ्य बोलून दाखवलं. हा माझ्यासाठी खूप भावनिक क्षण. मी काल बाळासाहेबांच्या समाधीवर गेलो होतो असं सांगत मराठी माणसासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येणं ही अतिशय मोठी बाब असल्याचं ते म्हणाले. मराठी शेतकऱ्याचा मुद्दासुद्धा त्यांनी अधोरेखित करत भाजप नेत्यांवर तोफ डागली आणि 'पाशवी बहुमत' मिळाल्याचा घणाघातही केला.