स्थापनेपासूनच मराठीच्या मुद्द्यावर मनसेनं आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. मराठी बोला, मराठी पाट्या, मराठी माणसांवरचा अन्याय या सगळ्या मुद्द्यावरच मनसेनं ठाम भूमिका घेतली आहे. आताही हाच मुद्दा असताना भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी मनसेला आव्हान दिलं आहे. त्यावरून मनसेच्या संदीप देशपांडेंनीही नितेश राणेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमराठी व्यापा-याला मारहाण केल्याच्या घटनेवरून मुंबईसह राज्यातलं राजकारण तापलं आहे. एकीकडे मराठीचा कैवार घेतलेली मनसे तर दुसरीकडे हिंदू धर्माच्या रक्षणासाठी आक्रमक असलेले भाजपाचे मंत्री आणि नेते नितेश राणे यांच्यातलं शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. मराठी भाषा, मराठी माणूस या मुद्द्यावरून मनसेनं अनेकांना चोप दिला आहे. नेमका हाच मुद्दा उचलून धरत भाजपाचे नेते आणि मंत्री नितेश राणेंनी पहिल्यांदा मनसेवर टीका केली आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्याला जोडत हिंदू धर्मियांना मारहाण करणा-यांमध्ये दम असेल तर त्यांनी भेंडीबाजार, नळबाजार किंवा मोहम्मद अली रोडला जाऊन लोकांना मारुन दाखवावं, असं आव्हान मनसेला दिलं.
नितेश राणेंनी ललकारल्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी प्रत्युत्तर दिलंय. रझा अकादमी विरोधात मनसेनं मोर्चा काढला होता तेव्हा भाजपाचे नेते कुठे होते? असा प्रश्न संदीप देशपांडेंनी विचारलाय. काटा चमचा चालवणा-यांनी आम्हाला तलवार चालवायला शिकवू नये, अशा शब्दांमध्ये देशपांडेंनी राणेंवर पलटवार केलाय.
भाजप नेते मंत्री नितेश राणे हे मराठी मात्र मनसेच्या मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी विरोधी भूमिका घेत हिंदूत्वाची भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात नितेश राणे आणि मनसेमध्ये सुरू झालेली शाब्दिक चकमक अजूनही वाढण्याची शक्यता आहे..