Raj Thackeray Appeal to Party: राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवालं व्हायचं नाही अशा शब्दांत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना आवाहन केलं आहे. मनसेचा आज 19 वा वर्धापन दिन असून यानिमित्ताने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना त्यांनी महाराष्ट्राचा राजकीय चिखल झाल्याची खंत व्यक्त केली. राजकीय मतांसाठी तुमची डोकी फोडत आहेत. हे आमच्या लोकांना समजत नाही असंही ते म्हणाले. मी गुढीपाडव्याला दांडपट्टा फिरवणार आहे, त्यामुळे आता चाकू, सुरे काढण्यात अर्थ नाही असं सांगत त्यांनी जास्त बोलणार नसल्याचं सांगितलं.
"महाराष्ट्राचा आज चिखल झाला आहे. फक्त राजकारण आणि राजकीय मतांसाठी तुमची डोकी फोडून घेत आहेत, आग लावत आहे आणि हे आमच्या लोकांना समजत नाही. मी 30 तारखेला सविस्तर बोलणार आहे. तुमची दिशाभूल करण्यासाठी जाती पातीचा विषय, सोशल मीडियावरुन टाळकी भडकवणं हे जाणुनबुजून उद्योग सुरु आहेत," अशी टीका राज ठाकरेंनी केली.
"आज आपल्या पक्षाला 19 वर्षं पूर्ण झाली. ती कशी, काय गेली? आज असंख्य पक्षांना यांचे आमदार येऊन गेले, इतकी मतं मिळाली, इतके पराभूत झाले, खासदारकील पराभूत झाले, तरी या पक्षातील माणसं एकत्र कशी राहतात हा प्रश्न पडला आहे. फेरीवाले बिचारे कष्टाने काम करत असतात. पण आता आलेले हे राजकीय फेरीवाले आपल्या पक्षात नाहीत. आज या फुटपाथवर, तिकडून कोणी डोळा मराला की त्या फुटपाथवर. हे असले राजकीय फेरीवाले आपल्याला उभे करायचे नाहीत. आपण खणखणीत दुकान बांधू, फेरीवालं व्हायचं नाही," असा निर्धार राज ठाकरेंनी व्यक्त केला आहे.
पुढे ते म्हणाले, "या सगळ्या गोष्टींसाठी एक पक्ष संघटना, म्हणून जी सगळीकडे आहेच, ती मजबूत करणं फार गरजेचं आहे. माझा जो गटाध्यक्ष आहे, त्याच्या कुटुंबालाही माझ्या मुलाची काळजी घेत आहेत असं वाटलं पाहिजे. यामुळे पुढच्या दोन दिवसांत महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. माझ्यासकट व्यासपीठावर जे बसले आहेत त्यांच्यासह, खाली बसले आहेत त्यांच्यासह प्रत्येकाचं काय काम असणार आणि ते दर 15 दिवसाला तपासलं जाणार. मी वरपासून खालपर्यंत यंत्रणा लावणार आहे. जर महिना आणि दीड महिन्यात हा पदाधिकारी, तो कोणीही असला तरी कामचुकारपणा दिसला तर मी त्याला पदावर ठेवणार नाही. त्याला हवं त्या फुटपाथवर जाऊन बसू देत. पण ती गोष्ट यापुढे होणार नाही".
"मुंबईत त्या दिवशी बैठक ठेवली होती. त्या बैठकीला शाखाध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विभाग अध्यक्ष हजर झाले नाहीत. मग हजर झाले नाहीत त्यांची हजेरी घेतली. प्रत्येकाला कारण विचारलं. त्यातील पाच सहा जणांनी कुंभला गेला होतो सांगितलं. त्यांना म्हटलं मग गधड्यांनो पापं कशाला करता. आल्यावर आंघोळ केलीस का हेदेखील विचारलं. आमचे बाळा नांदगावकर कमंडलूमधून पाणी घेऊन आले. मी म्हटलं हड मी नाही पिणार. मी त्या सोशल मीडियावर व्हिडीओ पाहतोय तिथे आलेल्या बाया, पुरुष अंग घासतायत. आणि बाळा नांदगावकर म्हणतात साहेब हे गंगेचं पाणी घ्या, कोण पिणार ते पाणी?," अशी खिल्ली राज ठाकरेंनी उडवली.
"12 तारखेला प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या दिल्या जातील. पदाधिकाऱ्यांची टीम तुमच्यापर्यंत येईल. ही संघटनात्मक गोष्ट आहे, ती संघटनात्मक राहिली पाहिजे. यामुळे सगळ्या गोष्टी उघड सांगू शकत नाही. त्याचे निकाल निवडणुकीत दिसले पाहिजेत. या दृष्टीकोनातून रचना सर्वांसमोर आणत आहोत. येत्या 30 तारखेला गुढीपाडव्याला गुलाब उधळत शिवतीर्थावर यावं," असं आवाहन यावेळी त्यांनी केलं.