मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करतील की नाही यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी त्यावर अधिकृत भाष्य केलं नाही. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असून, राज ठाकरेंसोबत युती केल्यास जागावाटप कसं करावं याचा तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आता राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. काम न करणाऱ्यांना थेट पक्षातून काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.
मनसेकडून मुंबईत संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना तसंच शाखाध्यक्षांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे. 24 जूनला याबाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणूका जाहीर होतील.
मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह 24 जूनला अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी केंद्रीय समित्यांना दिला आहे. मनसेत अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू आहे.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे नेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधवही उपस्थित आहेत. आदित्य ठाकरेही बैठकीला पोहोचले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
रात्री आमदार, खासदारांची बैठक आणि स्नेहभोजन वांद्रेतील ताज लँड्स एंड हॉटेलला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांना सूचना केल्या जात आहेत. सचिव अनिल देसाई पक्षाच्या सूचना पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत.