Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज ठाकरेंना नेमका काय प्रस्ताव द्यायचा? उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच; 'त्या' एका गोष्टीवरुन अडलंय युतीचं घोडं

ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा जोर धरत असतांनाच अचानकपणे फडणवीस-राज ठाकरेंची भेट झाली आणि या युतीच्या चर्चांमध्ये माशी शिंकली

राज ठाकरेंना नेमका काय प्रस्ताव द्यायचा? उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच; 'त्या' एका गोष्टीवरुन अडलंय युतीचं घोडं

ठाकरे बंधुच्या युतीच्या चर्चेचं घोंगडं बरेच दिवस झाले भिजत पडलं आहे. फडणवीस- राज ठाकरे भेटीनंतर या चर्चा थंडावतात की काय असंही वाटू लागलं होतं. पण, पुन्हा या युतीच्या जुन्या चर्चांना नवे धुमारे फुटत आहेत. मात्र, तरीही ठाकरे बंधुच्या मनोमिलनाचं हे घोडं नेमकं अडलंय कुठे? पाहुयात

ठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा जोर धरत असतांनाच अचानकपणे फडणवीस-राज ठाकरेंची भेट झाली आणि या युतीच्या चर्चांमध्ये माशी शिंकली. दोन भावांच्या मनोमिलनात राजकारणातले देवाभाऊ खोडा घालतात की काय असेही प्रश्न उपस्थित झाले. मात्र, अचानक झालेल्या या भेटीनं राज-उद्धव यांच्या एकत्र येण्याच्या आशा काही मावळलेल्या नाहीत. अजुनही ठाकरे बंधु एकत्र येऊ शकतात अश्या चर्चा नव्यानं होत आहेत. मात्र, आता या चर्चांदरम्यान आणखी एक नवी माशी शिंकली आहे. 


युती झालीच तर ती आपल्या अटी शर्तींवर का होऊ नये अशी भूमिका आता उद्धव ठाकरेंच्या पक्षातून घेतली जात असल्याचं समजत आहे.. माध्यमांसमोर नको, समोर येऊन युतीचा प्रस्ताव द्या असं जाहीर आवाहन मनसेकडून देण्यात आल्यानंतर आता युतीचा प्रस्ताव द्यायचा झाला तर नेमका प्रस्ताव द्यायचा तरी काय ? हा मुख्य प्रश्न आता उद्धव ठाकरेंसमोर आहे.


- मनसे-शिवसेना युतीचा प्रस्तावातला पेच काय? 

मनसेला नेमका काय प्रस्ताव द्यायचा? - उद्धव ठाकरेंसमोर पेच

युती कोणत्या जागांवर करायची ?- शिवसेनेची कोंडी

अनेक ठिकाणी शिवसेना आणि मनसेच्या मतदारांचं समसमान प्राबल्य

दोन्ही पक्षांकडून ठरावीक मतदारसंघ  आपले गड असल्याचा दावा 

मराठी मतांवर दोन्ही पक्षांचा दावा


मनसेला प्रस्ताव देण्यातली उद्धव ठाकरेंच खरी अडचण म्हणजे युती केल्यास मनसेसाठी सोडाव्या लागणा-या जागा. पक्षफुटीनंतर उद्धव ठाकरेंना स्वतच्या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी संख्याबळ वाढीची गरज आहे. त्यामुळे नवी युती करतांना संख्याबळ वाढीचा विचार करणं गरजेचं आहे. मात्र, मनसेकडे सध्याच्या घडीला एकही आमदार नाही त्यामुळे मनसेला युतीत जागा देतांना ही युती कागदावर कोणत्या गणितात बसवायची हा खरा पेच आहे.


याशिवाय राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरेंची युती भाजपचे वरिष्ठ नेते होऊ देणार नाहीत असं  काही नेत्यांना वाटतं असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे हे दोन भाऊ युतीपर्यंत पोहोचतायेच की युतीच्या रस्त्यातूनच यू टर्न घेतायेत हे येणारा काळच सांगेल

Read More