MNS on Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. अंधेरी पूर्व येथील मनसेचे पदाधिकारी वैभव दळवी यांचा शिवसेना ठाकरे गटात उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर प्रवेश पार पडला. मात्र संदीप देशपांडे यांनी पक्षप्रवेश घेतलेला हा आमचा पदाधिकारी नाही असं स्पष्ट केलं आहे. 2014 ला पदाधिकारी होता, त्याची हकालपट्टी केलेली आहे असं त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं.
"उद्धव ठाकरेंना त्यांचे पदाधिकारी फसवतात. मनसेचा पदाधिकारी फोडून आणला आहे. आणि त्याला प्रवेश करतोय हे बरं वाटावं म्हणून. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून फेरतपासणी करावी. पक्षप्रवेश घेतलेला हा आमचा पदाधिकारी नाही. 2014 ला पदाधिकारी होता, त्याची हकालपट्टी केलेली आहे. तेव्हापासून ना तो आमच्या बॅनरवर आहे, ना पदावर आहे. हा बदनाम व्यक्ती आहे. त्याच्यावर 354 सारखे केसेस आहेत," अशी माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर मोठं विधान केलं आहे. जे महाराष्ट्राच्या मनात आहे ते होईलच असं सांगत त्यांनी एकाप्रकारे युतीला हिरवा सिग्नलच दिला आहे. त्यावर संदीप देशपांडे म्हणाले की, "आम्ही कालच पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. राज ठाकरेच यासंदर्भात अंतिम निर्णय घेतील. ज्यावेळी एखादी ठोस गोष्ट होईल, एखादा प्रस्ताव येईल तेव्हा राज ठाकरे त्यासंदर्भात निर्णय घेतील. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात 2014, 2017 मध्येही होती. पण उद्धव ठाकरेंच्या मनात नव्हतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या मनात नेमकं काय आहे हे जास्त महत्त्वाचं आहे, जनतेच्या मनात काय आहे हे मला माहिती आहे".
मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना राज ठाकरे-उद्धव ठाकरे कधी एकत्र येणार यासंदर्भात विचारणा करण्यात आली. तसंच मनसेने तुम्ही आधी युतीचा प्रस्ताव पाठवावा अशी मागणी केल्याचं विचारलं असता ते म्हणाले, "जे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात आहे ते होईल". इतर बारकावे आम्ही पाहतो असं सांगत त्यांनी यापेक्षा जास्त भाष्य करण्यास नकार दिला.
"मी संदेश नाही, बातमीच देईन. माझ्या शिवसैनिकांच्या मनात संभ्रम नाही. त्यांचेही मनसैनिक आमच्या संपर्कात आहे. त्यांच्याही मनातही संभ्रम नाही. त्यामुळे संदेश देण्यापेक्षा बातमीच देईन," असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.