हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा जीआर रद्द झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यां बंधूनी विजयी मेळावा वरळी डोम येथे सुरु आहे. या विजयी सभेत ठाकरे बंधू यांनी एकमेकांना तब्बल 20 वर्षांनी मिठी मारल्याचं चित्र उभ्या महाराष्ट्राला पाहायला मिळालं. ठाकरे बंधूंनी एकत्र यावं ही प्रत्येक मराठी माणसाची इच्छा होती. अखेर हिंदी सक्तीच्या मुद्यावरुन तो क्षण पाहायला मिळाला.
सुमारे दोन दशकांनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर आले आहेत. यामुळे राज्यातील वातावरण चांगंलच तापलं आहे. हा क्षण अतिशय अनोखा अन् खास होता. 'आवाज मराठीचा' असं ठसठसीत अक्षरात स्टेजवर लिहिलं आहे. या स्टेजवर दोघांनी एन्ट्री करताच उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंना मिठी मारली. एवढंच नव्हे तर दोघांनी हात वर करुन शक्ती प्रदर्शन दाखवलं आगे. स्टेजवर फक्त दोन खुर्च्या होत्या. ज्यावर दोन बंधू राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे विराजमान झाले.
20 वर्षानंतर मी आणि उद्धव एका व्यासपीठावर आलो. जे माननीय बाळासाहेबांना अनेकांना जमलं नाही, आम्हाला एकत्र आणायचं देवेंद्र फडणवीसांना जमलं, अशी सुरुवात राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची केली.
तुमच्याकडे सत्ता असेल ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर, अशा शब्दांत राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना ललकारलं. एक पत्र लिहिलं, दोन पत्र लिहिली, दादा भुसे आले. म्हणे आम्ही काय म्हणतो समजून आणि ऐकून तर घ्या. मी म्हटलं मी ऐकून घेईन पण ऐकणार नाही. मराठीच्या विषयामध्ये तिसरी भाषा लादताय. कुठून त्रिभाषा सूत्र आणलं? त्रिभाषा सूत्र आणलं ते म्हणजे केंद्र आणि राज्य शासनाच्या दुव्यासाठी. आज कोर्टात जा, बँकेत जा, कुठे आहे त्रिभाषा सूत्र? केंद्राच्या धोरणात नाही, इतर कोणत्या राज्यात नाही.... महाराष्ट्रात प्रयोग करायला पाहिजे... महाराष्ट्र ज्या वेळी पेटून उठतो त्यावेळी काय घडतं हे राज्यकर्त्यांना समजलं असेल त्याशिवाय का माघार घेतली? राज ठाकरे यांचा खडा सवाल.