Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

Raj Thackeray Vs Sushil Kedia वादात मुंबई पोलिसांची उडी; माफीनंतरही प्रकरण चिघळणार?

Raj Thackeray Vs Sushil Kedia: ठाकरेंच्या विजयी मेळाव्याआधी वेगवेगळ्या पोस्टमधून राज ठाकरेंना लक्ष्य करणाऱ्या केडियाने माफी मागितली.

Raj Thackeray Vs Sushil Kedia वादात मुंबई पोलिसांची उडी; माफीनंतरही प्रकरण चिघळणार?

Raj Thackeray Vs Sushil Kedia: शनिवारी ठाकरेंच्या विजयी मेळाव्यानंतर पक्षाध्यक्ष राज ठाकरेंचा एकेरी उल्लेख करत त्यांना थेट आव्हान देणारे गुंतवणूक विश्लेषक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंची माफी मागत प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र याच प्रकरणात आता एक नवीन घडामोड समोर आली आहे. ठाकरेंच्या मेळाव्याला तासभर शिल्लक असतानाच शनिवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांनी केडियांच्या कार्यालयाची तोडफोड केली. मात्र ही तोडफोड करणं या कार्यकर्त्यांना चांगलेच महागात पडलं आहे.

राज ठाकरेंना अनेकदा डिवचलं

केडियांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी पाच संशयितांना शनिवारी ताब्यात घेतले आहे. समाज माध्यमांवर केडिया यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता.  त्यात त्यांनी मुंबईत 30 वर्षे राहूनही मी मराठी बोलू शकत नाही. राज ठाकरे तुम्हाला काय करायचं ते करुन घ्या, अशा आशयाची पोस्ट करत मनसेला खुली आव्हान दिलं होते. त्यानंतरही अन्य पोस्टमध्ये एकही जागा न निवडून आलेला पक्ष वगैरे असे संदर्भ देत केडिया यांनी मनसेला लक्ष्य केलेलं. मुंबईतील मीरा-भाईंदर परिसरात एका दुकानदाराला मराठी न बोलल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर केडिया यांच्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले.

कार्यालयावर हल्ला, व्हिडीओ अन् ताब्यात घेतले कार्यकर्ते

शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास वरळीमधील मेळाव्याला सुरुवात होण्याच्या काही काळ आधीच मनसे कार्यकर्त्यांनी वरळीमधीलच सेन्च्युरी बाजार येथील व्ही वर्क येथील केडीया यांच्या कार्यालयातील काचेच्या दरावर नारळ फेकले. सुरक्षारक्षकांनी हल्लेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना फरसं यश आलं नाही. कार्यकर्ते ‘मराठीचा अपमान सहन केला जाणार नाही’ अशा घोषणा देत होते आणि राज ठाकरे यांचा जयजयकार करत होते. या हल्ल्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. याच व्हिडीओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करुन पाच संशयितांना केडियांच्या कार्यालयावर हल्ला केल्याप्रकरणी ताब्यात घेतलं आहे. या अटकेमुळे माफीनंतरही हे प्रकरण चिघळणार की काय अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

केडियांचा माफीनामा

दरम्यान, मेळावा संपल्यानंतर अर्ध्या तासात केडिया यांनी सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ पोस्ट करत माफीनामा जाहीर केला. "माझं ट्विट चुकीच्या मनस्थितीत, दबावाखाली आणि तणावाखाली करण्यात आलेलं. त्यानंतर ह् ट्विट लोकांनी चुकीच्या पद्धतीने हाताळं आणि त्यातूनच वाद निर्माण झाला.  मराठी न जाणणाऱ्यांवर हिंसा होत असल्याने मी ओव्हररिऍक्ट केलं. त्यामुळे मी माझं हे ओव्हररिऍक्टिंग मागे घेण्याचे ठरवले," असं म्हणत केडिया यांनी माफी मागितली. "30 वर्षे मुंबईत राहूनही मला मराठी भाषेची जितकी प्रावीण्यत आणि स्पष्टता मिळवायला हवी होती तितकं आपल्याला जमलं नाही. त्यामुळे मी मराठी भाषा फक्त अनौपचारिक वातावरणात आणि जवळच्या लोकांसोबत वापरली. भयाचे वातावरण असल्याने मराठी भाषेचा वापर करताना अनावश्यकपणे चुका होण्याची शक्यता असते, ज्यामुळे वाद निर्माण होऊ शकतो, असे ते माफीनाम्यात म्हणाले. 

Read More