Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

राज्यात कधी दाखल होतोय मान्सून, जाणून घ्या...

अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आहे. 

राज्यात कधी दाखल होतोय मान्सून, जाणून घ्या...

मुंबई : महाराष्ट्रात ६ जूनपर्यंत नैऋत्य मोसमी वारे पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय. अरबी समुद्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या प्रगतीला पोषक वातावरण निर्माण झालंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी केरळमध्ये मंगळवारी दमदार आगमन  केलं. त्यानंतर आता केरळचा बहुतांश भाग आणि तामिळनाडू या राज्यांत बहुतांश भाग नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी व्यापला आहे. गुरुवारपर्यंत मान्सून कर्नाटकात पोहोचण्याची शक्यता आहे. 

तपमानात घट 

तत्पूर्वी अरबी समुद्रात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्रात सध्या ढगाळ हवामान आहे. बुधवारपासून कोकण, मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा तर गुरूवारपासून मराठवाडा विदर्भात तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. तपमानात १ ते २ अंशांची घट झालीय. दक्षिण महाराष्ट्र आणि किनारपट्टीलगत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहात आहेत. त्यामुळे उंच लाटा उसळणार आहेत. मच्छीमारांनी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आलाय.  

शेतकऱ्यांनो, पेरणीची घाई नको... 

मान्सूनचे केरळमध्ये आगमन झालं आहे आणि पुढच्या आठवड्यात मान्सून महाराष्ट्रात येईल  मात्र  महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतरही  पेरणीची घाई करू नये असं आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात आलंय. १ जूननंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील असा अंदाज आहे. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळ वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. तसंच वादळी वारा आणि वीजांपासून नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. या कालावधीत झाडांखाली, मोकळ्या जागेत, टिनच्या शेडखाली, वीजप्रवाह असलेल्या तारांखाली आसरा घेऊ नये अशा सूचना देण्यात आल्यात. 

Read More