Monsoon Update For August and September : यंदाच्या वर्षी मान्सून अपेक्षेहून आधीच देशात धडकला आणि राज्यातसुद्धा त्याचा दमदार प्रवेश बराच आधी झाला. जून महिन्याच्या मध्यावर पावसानं काहीशी दडी मारली, मात्र जुलै महिन्यात पुन्हा पावसनं जोर धरल्याचं पाहायला मिळालं. याच महिन्याच्या अखेरिस मात्र राज्याच्या बहुतांश भागांतून पावसाचा जोर ओसरल्यानं 'गेला मान्सून कुणीकडे?' असं म्हणण्याची वेळ आली. पण, ऑगस्टमध्ये हे चित्र पूर्णपणे वेगळं असणार आहे. केंद्रीय हवामानशास्त्र विभागानंच यासंदर्भातील माहिती दिली असून, मान्सूनच्या पुढील अर्थात दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकं पर्जन्यमान किती आणि कसं असेल याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे.
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी IMD कडून जारी करण्यात आलेल्या माहितीच्या हवाल्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिक सोप्या शब्दांत हवामान अंदाज सांगितला. 'मान्सूनच्या दुसऱ्या भागात (ऑगस्ट आणि सप्टेंबर) देशाच्या बहुतेक भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता. पूर्वोत्तर प्रदेश, पूर्व भारताच्या लगतच्या अनेक भागांत, मध्य भारताच्या काही तुरळक भागात व दक्षिण भारताच्या नैऋत्य भागांत; पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो.', असं होसाळीकर यांनी स्पष्ट केलं.
मध्य भारताचे अनेक भाग, द्वीपकल्पीय भारताचे पश्चिम भाग, ईशान्य भारत, पूर्व भारताचे काही भाग आणि यासह वायव्य भारतात पाऊस सामान्यपेक्षा कमी असू शकतो असंही त्यांनी माहिती देत स्पष्ट केलं.
IMD च्या माहितीनुसार मान्सूननं जवळपास सारा देश व्यापला असून, परिणामस्वरुप ऑगस्ट महिन्यात ईशान्य आणि पूर्वेकडील राज्य वगळता ऑगस्टमध्ये सरासरीइतक्या पावसाचा अंदाज आहे.
Outlook for the Rainfall during Second Half of the SW Monsoon Season (August – September) and Monthly Rainfall and Temperature during August, 2025
— India Meteorological Department (@Indiametdept) July 31, 2025
For more information, visit: https://t.co/Va2QE87d4L#imd #weatherupdate #mausam #outlook #season #temperatures #Rainfall… pic.twitter.com/zM9gYO3Xwo
भारतीय हवामानशास्त्र विभागाने महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिलेल्या माहितीनुसार मान्यूनच्या आगमनानंतर यंदा जून-जुलैमध्ये जास्त पाऊस झाला असून हिमाचल प्रदेशात यंदा या पावसानं प्रचंड नुकसान झालं.
पावसाचा एकंदर अंदाज आणि पुढील दोन महिन्यांसाठीची मान्सूनची तयारी पाहता सागरी वाऱ्यांची दिशा आणि वेग अपेक्षेप्रमाणं राहिल्यास यंदा गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सवसुद्धा पाऊस गाजवणार असं म्हणणं गैर ठरणार नाही. त्यामुळं आता गणेशोत्सवासाठी गावाकडे जायची तयारी करत असाल किंवा सणवारांच्या खरेदीच्या विचारात असाल तर पावसाला विसरुन चालणार नाहीय!