Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

महिन्याचं भाडं ₹15.96 कोटी, अनामत रक्कम ₹104 कोटी.. मुंबईत येतेय 'ही' कंपनी; ऑफिस Address..

Mumbai Real Estate Deal: मुंबईमधील सर्वात मोठ्या भाडेकरारांपैकी हा एक व्यवहार असल्याचं सांगितलं जात आहे. हा करार तब्बल 9 वर्षांसाठी करण्यात आला असून दर 3 वर्षांनी भाडं वाढणार आहे.

महिन्याचं भाडं ₹15.96 कोटी, अनामत रक्कम ₹104 कोटी.. मुंबईत येतेय 'ही' कंपनी; ऑफिस Address..

Mumbai Real Estate Deal: अर्थविषय सेवा पुरवणाऱ्या जगभरातील आघाडीच्या कंपनींपैकी एक असलेल्या वित्तीय सेवा पुरवठा कंपनी 'मॉर्गन स्टॅनली'ने मुंबईतील रिअल इस्टेट क्षेत्रामधील एक मोठा व्यवहार नुकताच केला आहे. मात्र हा व्यवहार खरेदी-विक्रीसंदर्भातील नसून भाडेकराराचा आहे. या कंपनीने 10 लाख स्वेअर फुटांची जागा भाडे तत्वावर घेतली आहे. विशेष म्हणजे 9 वर्षांचा हा करार करताना ही कंपनी मुंबईतील या ऑफिसच्या जागेसाठी महिना 15.96 कोटी रुपये भाडं देणार आहे. यासंदर्भातील भाडेपट्टीचा करार आणि इतर कागदपत्रांच्या आधारे 'प्रॉपस्टॅक'ने ही माहिती दिली आहे.

कुठे आहे हे ऑफिस?

समोर आलेल्या माहितीनुसार, मॉर्गन स्टॅनली अ‍ॅडव्हानटेज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने हा व्यवहार झाला आहे. सदर कार्यालयाची जागा ही मुंबईचे उपनगर असलेल्या गोरेगाव पूर्वमधील ओबोरॉय गार्डन सिटी येथील ओबोरॉय कॉमर्स 3 इमारतीच्या 16 व्या मजल्यावर आहे. कंपनीने संपूर्ण 16 मजलेच भाडेतत्वाने घेतले आहे. ज्या जागेची रक्कम कंपनी मोजणार आहे तिचा एरिया 10.01 लाख स्वेअर फूट इतका आहे. 

अनामत रक्कमेचा आकडा पाहून येईल आकडी

हा भाडेकरार 28 ऑगस्ट 2024 रोजी करण्यात आल्याचं कागदपत्रांवरुन स्पष्ट होत आहे. ही जागा ओबोरॉय रिअ‍ॅलिटी लिमिटेड या कंपनीने जागा भाडेतत्वावर दिली आहे. या करारामध्ये 1.97 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरण्यात आली असून अनामत रक्कम म्हणून 104 कोटी 90 लाख रुपये भरण्यात आली आहे. 

आधीच केलेली घोषणा

मॉर्गन स्टॅनलीने 2020 साली मुंबईमध्ये ग्लोबल इन-हाऊस सेंटर (जीआयसी) ऑप्रेशन्ससाठी कार्यालय घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांनी यावेळेस अगदी जिथे कार्यालय घेऊन सांगितलं होतं तिथेच आताच्या कार्यालयाची जागा आहे. यापूर्वी कंपनी जीआयसीचं काम तीन वेगवेगळ्या ठिकाणांवरुन काम करत होती. हे काम आता एकाच कार्यालयातून केलं जाणार आहे. 

वाढत जाणार भाडं

आता करण्यात आलेल्या करारानुसार, 3 वर्षानंतर जागेचं भाडं 15 टक्क्यांनी वाढेल. त्यानंतर पुन्हा तीन वर्षांनी भाड्यात 15 टक्क्यांची वाढ होईल. 16 पैकी 14 मजल्यांचा भाडेकरार 1 एप्रिल 2024 पासून करण्यात आला आहे. ओबोरॉय कॉमर्स 3 इमारत 51 मजल्यांची कॉर्परेट इमारत आहे. ए ग्रेडेट कमर्शिअल टॉवर असलेल्या ओबोरॉय कॉमर्स 3 इमारतीमध्ये 51 लिफ्ट आहेत. तसेच इमरतीच्या तळाशी तीन मजल्यांपर्यंत पार्किंगची सोय आहे.

अनेक बड्या कंपन्यांची या इमारतीत ऑफिस

यापूर्वी डेलॉइट शेअर्ड सर्व्हिसेस इंडिया एलपीपी या कंपनीने ओबोरॉय कॉमर्स 3 इमारतीमध्ये 80 हजार 849 स्वेअर फुटांची जागा 2.09 कोटी रुपयांच्या मासिक भाड्यावर घेतली आहे. याच इमारतीमध्ये नेल्सन मिडिया आणि त्यांची उपकंपनी असलेल्या वॉट्स ऑन इंडिया मिडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1.52 लाख स्वेअर फुटांची जागा ओबोरॉय कॉमर्स 3 इमारतीत महिना 3 कोटी 87 लाख रुपये भाडेतत्वावर 10 वर्षांसाठी घेतली आहे.

Read More