ठाणे जिल्ह्यातील नौपाडा परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका जन्मदात्या आईनेच आपल्या 17 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. एवढ्यावरच हा प्रकार थांबला नाही तर आईने आजी आणि अनोळखी बाईच्या मदतीने मुलीचा मृतदेहाची विल्हेवाट लावली. हा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
ही 17 वर्षांची मुलगी जन्मतः अंपग असल्यामुळे तिच्या अपंगत्वाला कंटाळून घरच्यांनी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली. या मुलीला आईने विषारी औषध देऊन तिची हत्या केली. आई आणि अनोळखी महिला या मुलीचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. मृतदेह गाडीत टाकतानाचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
प्राथमिक माहिती समोर आली की, ठाणे जिल्ह्यातील या घटनेत 17 वर्षीय अपंगत्व मुलीला आईने विष देऊन मारलं आहे. एवढंच नव्हे तिच्यावर लपून छपून अंत्यसंस्कार देखील केल्याच म्बटलं आहे. मुलीच्या इतर नातेवाईकांनी याची तक्रार पोलिस ठाण्यात केली आहे. यानंतर मुलीचे आई-वडिल आणि आजीवर हत्या, पुरावे नष्ट करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ठाणे येथील तळोपाली येथील पार्वती अपार्टमेंट येथील रहिवासी वर्षा रघुनंदन (42) यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, मृत मुलगी यशस्वी पवार जन्मापासूनच अपंग होती आणि ती तिची आई स्नेहल पवार (35), वडील राजेश पवार आणि आजी सुरेखा महागडे यांच्यासोबत ठाणे येथील शिवाजी पथ येथील त्यांच्या घरी राहत होती. तक्रारदाराने आरोप केला आहे की, 19 फेब्रुवारी 2025 च्या रात्री मुलीला काही प्रकारचे औषध देण्यात आले, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. नंतर, गुन्हा लपविण्यासाठी, मृतदेह एका वाहनात नेण्यात आला आणि कुठेतरी अंत्यसंस्कार करण्यात आले, असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस पथक 'अमृत' मुलीच्या घरी पोहोचले आणि तिच्या आजीची चौकशी केली. चौकशीदरम्यान असे आढळून आले की मुलगी आधीच आजाराने ग्रस्त होती. 19 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजता मुलीच्या आईने तिला काही गोळ्या दिल्या होत्या. ज्यामुळे तिचा मृत्यू झाला. सध्या पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि आजीला ताब्यात घेतले आहे. तर मुलीच्या हत्येपासून तिचे पालक फरार आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.