Sanjay Raut On Mumbai Issue: "ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मराठी एकजूट टिकली नाही तर काय होईल? या प्रश्नाचे उत्तर स्पष्ट आहे. मुंबई पूर्णपणे अदानी-लोढा वगैरेंच्या घशात जाईल व एक दिवस मुंबई महाराष्ट्रात राहणार नाही," अशी भीती उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे. "भाजपचा एक खासदार निशिकांत दुबे दिल्लीत बसून मराठी माणसाला भिकारी म्हणतो व मारण्याची धमकी देतो ती कशाच्या जोरावर? आज फूटपाथवरच्या झोपडीवाल्यास आणि धारावीकरांना जसे उडविले जाते आहे तसे तुम्हाला, आम्हाला उद्या उडविले जाईल. गिरगाव, परळ, शिवडी, दादर, विलेपार्ले, मुलुंड, अंधेरी या लढाईत केव्हाच पडले आहे. लोढा यांचे टावर्स अलिबाग आणि मांडव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले दिसत आहेत. उद्या सध्याचे मुख्यमंत्री आपले मंत्रालय अलिबाग, उरणला नेऊन अटल सेतूचा सदुपयोग करणार आहेत. कारण भाजपला मुंबई ही परप्रांतीय पैसेवाल्यांची रखेल करायची आहे," असा घणाघात राऊतांनी केला आहे.
"वैभव नाईक भेटायला आले. सिंधुदुर्गातील सर्व मोक्याच्या जमिनी गुजरातच्या दलालांनी ताब्यात घेतल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शिवरायांचा रायगडही मराठी राहिलेला नाही. आता काय करायचं? मुंबईतील गिरणी कामगारांचा लढा सुरूच आहे. त्यांना बदलापूरच्या पुढे वांगणी, शेलू अशा गावांत ढकलले, तेथे घरे दिली. मुंबईतील धारावी, मिठागरे, वांद्रे रेक्लमेशन, दहिसर, मुलुंड टोलनाका, मदर्स डेअरीपासूनचे सर्व भूखंड, जमिनी अदानी या एकाच माणसाकडे. आता गोरेगावचे मोतीलाल नगरही अदानीने मिळवले. या सगळ्यांत गिरणी कामगार, मराठी माणूस कोठे आहे? ही सर्व भाजपची गुंतवणूक अदानी सांभाळत आहे. एकनाथ शिंदेंना त्यांचा वाटा मिळतो. त्यामुळे दाढीला रंग लावून ते गप्प आहेत. पुन्हा त्याच अदानीच्या पैशांवर ‘ठाकरे एकत्र कसे येतात ते पाहतो,’ अशी मस्तवाल भाषा सुरू आहे," असं राऊतांनी म्हटलं आहे.
"मराठी माणसाला सगळ्यांत आधी मुंबई, ठाण्याची लढाई लढावी लागेल. भ्रष्टाचाराच्या पैशांतून मराठी माणसाचा पराभव या दोन्ही शहरांत घडवायचा व मराठी अस्मितेचा शेवटचा खिळा ठोकायचा हे ठरलेले आहे. भारतीय जनता पक्षाला संयुक्त महाराष्ट्र, अखंड महाराष्ट्र, मराठी अस्मिता या सगळ्यांशी घेणे-देणे नाही. तसे ते कधीच नव्हते. आधी मुंबईची लूट करायची, मग मुंबई केंद्रशासित करायची. त्यानंतर स्वतंत्र विदर्भाचा डाव टाकून महाराष्ट्राचे अस्तित्व नामशेष करायचे हे भाजपचे उघड धोरण आज दिसते. याविरोधात उठाव झाला तर तो रोखण्यासाठी गुंडांच्या सर्वपक्षीय टोळ्या भाजपमध्ये सामील करून घेतल्याच आहेत," असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नक्की वाचा >> 'एक दिवस स्वतः राज ठाकरेच समोर येऊन...'; फडणवीस, शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचं विधान
"फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचे आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत. त्यामुळे ते आज एकत्र आहेत. याच आर्थिक हितसंबंधांमुळे त्यांनी मराठी माणसाचा विषय वाऱ्यावर सोडला. मराठीसाठी लढणाऱ्यांना उद्या हे शहरी नक्षलवादी ठरवतील. त्यासाठीच त्यांनी जनसुरक्षा कायदा आता आणला आहे," असं राऊत म्हणालेत.
"लढवय्या मराठी जनतेला मोगल काळातील ‘खोजे’ बनवण्याचा उपक्रम सुरू आहे. राज्यावर ‘खोजे’ मंडळींचेच राज्य आहे. या खोज्यांना मराठी माणसांची एकजूट नको, ठाकरे बंधूंनी एकत्र येणेही नको. हे सर्व व्यापाऱ्यांचे मनसुबे उधळले जातील. महाराष्ट्राचे पुण्य आणि 106 हुतात्म्यांचा त्याग कामी येईल," असं राऊत लेखाच्या शेवटी म्हणालेत.