Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

ST ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीटामध्ये 15 टक्के सूट

एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी. 1 जुलैपासून आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये मिळणार 15 टक्के सूट. 

ST ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीटामध्ये 15 टक्के सूट

MSRTC Ticket Booking : एसटीने प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी. एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या म्हणजेच 150 किलोमीटर पेक्षा जास्त प्रवासासाठी आता आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना पूर्ण तिकीट धारी म्हणजेच सवलतधारक प्रवासी वगळून प्रवाशांना तिकीट दरात 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. यामुळे लांब पल्ल्याच्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. या योजनेचा लाभ तुम्ही दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुरु राहणार आहे. 

दरम्यान, एसटीची ही योजना 1 जुलैपासून लागू करण्यात येत आहे. त्यामुळे आगाऊ आरक्षण करणाऱ्या नागरिकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी नागरिकांना केलं आहे. 

नेमकं काय म्हणाले प्रताप सरनाईक? 

एसटी महामंडळाचे अध्यक्ष तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी 1 जून रोजी एसटीच्या 77 व्या वर्धापन दिनी लांब पल्ल्याच्या बसमधून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी खास घोषणा केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, 1 जुलैपासून आगाऊ आरक्षण केल्यास नागरिकांना एसटीच्या तिकीटामध्ये 15 टक्के सूट देण्यात येणार आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या बसेसचा समावेश असणार आहे.  ही योजना पूर्ण तिकीट काढणाऱ्या प्रवाशांसाठी असणार आहे. 

दरम्यान, आषाढी एकादशी आणि गणपतीसाठी गावी जाणाऱ्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. कारण राज्यभरातून भाविक हे पंढरपूर येथे येत असतात. त्यामुळे जर त्यांना पंढरपूरला यायचं असेल तर पूर्ण तिकीट असणाऱ्या नागरिकांना आगाऊ आरक्षणामध्ये 15 टक्के सवलत दिली जाणार आहे. तसेच पुढील काही दिवसांमध्ये गणपती उत्सव देखील येत असल्यामुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी प्रवाशांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. 

इ-शिवनेरी बसमधील प्रवाशांना घेता येणार लाभ

इ-शिवनेरी ही महाराष्ट्रातील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एक नवीन इलेक्ट्रिक बस सेवा आहे. ही बस मुंबई-पुणे मार्गावर चालते आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाते. या बसमध्ये देखील आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना देखील 15 टक्के सूट मिळणार आहे. आगाऊ आरक्षण बुकिंगसाठी तुम्हाला प्रत्यक्ष तिकीट खिडकीवर किंवा npublic.msrtcors.com या अधिकृत वेबसाईटवर किंवा msrtc Bus Reservation या मोबाईल अॅपवर देखील तुम्ही तिकीट बुक केल्यास ही सवलत मिळणार आहे. 

Read More