Mumbai Central Rail Line Underground: जमिनीखालील मेट्रो लाईन काही महिन्यांपूर्वीच राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये सुरु झाली. मात्र आता लवकरच मुंबईला पहिलीवहिली अंडर ग्राऊण्ड लोकल ट्रेनही मिळण्याची दाट शक्यता आहे. मध्य रेल्वेने मुंबईतील उपनगरीय रेल्वे वाहतुकीचं जाळं विस्तारण्याचा आणि अधिक आधुनिक करण्याचा निर्णय घेतला आहे. दक्षिण मुंबईमधील परळ अथवा करी रोड येथून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान पाचव्या आणि सहावी मार्गिका तयार करण्याचा मध्य रेल्वेचा विचार असून या मार्गिका जमिनीखाली उभारण्यात येणार असल्याचं वृत्त 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलं आहे.
पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी या प्रकल्पाचा भाग असलेल्या पहिल्या टप्प्याचं काम सुरु आहे. हा टप्पा कुर्ला ते परळ या 10.1 किलोमीटरच्या अंतराचा आहे. मात्र या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये अधिक मोठ्या आकाराचं बांधकाम असून हे बांधकाम कुर्ला-परळ- सीएसएमटी या मार्गिकेवर असणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील काम हे परळपासून सीएसएमटीपर्यंतच्या 7.4 किलोमीटर लांबीच्या मार्गावर होणार आहे. मुंबईमधील उपगनरीय रेल्वे गाड्यांची वाढती वाहतूक आणि प्रवासी संख्येमुळे येणार ताण कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबवला जात आहे.
जमिनीअंतर्गत तंत्रज्ञान वापरुन हा मार्ग उभारल्यास या माध्यमातून मध्य रेल्वेचं बांधकाम हे नवीन कालानुरुप असेल असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. मेट्रोला ज्या पद्धतीने जमिनीअंतर्गत बांधकाम करुन यश मिळत आहे त्याच फॉरम्युल्यावर ही जमिनीखालून ट्रेनची उभारणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुंबईसारख्या शहरामध्ये भरमसाठ वेगाने होणारी वाढ लक्षात घेता हे जमिनीखालील बांधकाम करण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती आहे.
"आमच्याकडे सर्व परवानग्या, परळ आणि सीएसएमटी स्थानकाजवळ बोरिंग मशिनने बोगदा खोदण्यासाठी आवश्यक असलेली जमीन अशा साऱ्या गोष्टी आहेत. याबद्दल अंतिम अभ्यासानंतर निर्णय घेतला जाईल आणि जागेची निवड केली जाईल. एकदा जमिनीखाली मार्ग सापडला की आम्ही तो बोगदा सीएसएमटी येथ संपणार अशी रचना करुन काम सुरु करु," असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी 'हिंदुस्तान टाइम्स'शी बोलताना सांगितलं.
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, मध्य रेल्वेने यासंदर्भात प्राथमिक चर्चा केली आहे. मात्र याबद्दलचा अंतिम निर्णय तांत्रिक आणि आर्थिक निकषांसंदर्भातील अभ्यास अहवालावर अवलंबून असेल. या मार्गाला परवानगी मिळाली तर तो उभारण्यासाठी 3 हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. नेमकं कोण हे काम करणार याबद्दल कोणतीही स्पष्टता अद्याप नाही. या प्रकल्पाचा अंतिम निर्णय सविस्तर अहवालानंतर घेतला जाणार आहे. समोर अनेक आव्हानं असताना, अधिकाऱ्यांना विश्वास आहे की या निर्णयामुळे मुंबईमधील वाढवत्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या मागण्या पूर्ण करण्याची क्षमता या प्रकल्पात आहे.
एप्रिल महिन्यामध्ये कॉम्प्ट्रोलर अॅण्ड ऑडीटर जनरल म्हणजेच कॅगने भारतीय रेल्वेवर ठपका ठेवताना मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ल्यादरम्यानच्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचं काम लांबवत असल्याचं म्हटलं आहे.
हा प्रकल्प 2008 साली सुरु झाला असून 17 वर्षानंतरही तो पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प दोन टप्प्यात विभागण्यात आला असून सध्या पहिल्या टप्प्याचं परळ आणि कुर्ल्यादरम्यानचं काम सुरु आहे.