Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

सॉफ्टवेअर इंजिनिअरने अडचणींवर मात करण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेतला अन् तिथेच घोळ झाला; आली पश्चातापाची वेळ

Mumbai Crime News:  मुंबईतील  सॉफ्टवेअर इंजिनीअरने त्याच्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि जीवन सुधारण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेतला. पण त्याला १२ लाखांचा गंडा बसला आहे.   

सॉफ्टवेअर इंजिनिअरने अडचणींवर मात करण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेतला अन् तिथेच घोळ झाला; आली पश्चातापाची वेळ

Mumbai Crime News: सायबर फसवणुकीचा विळखा आता वाढत चालला आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला संकुलात (बीकेसी) राहणाऱ्या एका २४ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनीअरलाही चक्क सायबर फसवणुकीचा फटका बसल्याचे समोर आले आहे. आपल्या वैयक्तिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी ज्योतिषाचा आधार घेणे चांगलेच महागात पडले आहे. यामुळं त्याला चक्क 12 लाखांचा गंडा घालण्यात आला आहे. 

तरुणाने ‘डिव्हाइन टॉक’ नावाच्या ऑनलाइन अॅपद्वारे ज्योतिषाचा सल्ला घेतला, परंतु त्याला सायबर फसवणुकीचा बळी पडावे लागले आणि तब्बल 12.21 लाख रुपये गमवावे लागले. या प्रकरणी मुंबईच्या सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या तरुणाने आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी हे अॅप डाउनलोड केले होते. 

तरुणाने अॅप डाउनलोड केल्यानंतर त्या अॅपवर त्याची ओळख ‘निशांत’ नावाच्या कथित आध्यात्मिक गुरूशी झाली होती. निशांतने त्याला सांगितले की, ६,३०० रुपये खर्चून एक विधी केल्यास त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. त्याने ही रक्कम भरली, परंतु त्यानंतर फसवणुकीचा सिलसिला सुरू झाला. याच्या आयुष्यावर कथित संकट टाळण्यासाठी त्याला वारंवार पैसे भरण्यास सांगण्यात आले. त्यानुसार त्यांनी पैसे भरण्यासाठी सावकाराची मदत देखील घेतली. 

तरुणाने क्रेडिट कार्डचा वापर करून आणि खासगी सावकारांकडून पैसे उधार घेऊन एकूण १२.२१ लाख रुपये फसवणूक करणाऱ्यांना दिले. सहा दिवसांत ही रक्कम त्याच्याकडून उकळली गेली. रक्कम भरूनही काहीच परिणाम न जाणवल्याने तसंच त्यानंतर कोणतीही प्रतिक्रिया न आल्याने काहीतरी घोळ असल्याचे त्याला संशय आला. शेवटी मित्रांशी बोलल्यानंतर त्याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. 

Read More