ATM In Nashik Panchavati Express News: मुंबई ते मनमाडदरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्स्प्रेसमध्ये आता एटीएमची सुविधा प्रवाशांना मिळणार आहे. धावत्या ट्रेनमध्ये एटीएम असलेली ही भारतातील पहिलीच एक्सप्रेस ठरली आहे. त्यामुळं आता प्रवाशांना धावत्या ट्रेनमधूनही पैसे काढता येणार आहे.
अनेकदा रेल्वेचा प्रवास 15 तासांवरदेखील जातो. अशावेळी प्रवासासाठी काढलेले पैसे खर्च होतात. त्यामुळं प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता असते. हीच गरज लक्षात घेऊन रेल्वेने आता ट्रेनमध्येच एटीएमची सुविधा सुरू केली आहे. त्यामुळं प्रवाशांना आता ट्रेनमधूनही रक्कम काढणे सोयीचे ठरणार आहे.
मध्य रेल्वेच्या मनमाड वर्कशॉपमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करुन एक खास कोच तयार करण्यात आला आहे. त्यातच हे एटीएम बसवण्यात आले असून हा कोच आता पंचवटी एक्स्प्रेसला जोडण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी एटीएम सेवा असलेली ही ट्रेन मुंबईत दाखल झाली आहे.
पंचवटी एक्स्प्रेसच्या एसी चेअर कारमध्ये हे एटीएम बसवण्यात आले आहे. चालत्या ट्रेनमध्ये एटीएमचे काम योग्य रितीने पार पाडावे यासाठी योग्य विद्युत प्रणाली आणि संरचनात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने हे एटीएम मशीन पुरवले आहे. हे मशीन सुरक्षित राहण्यासाठी याला एक शटरदेखील लावण्यात आले आहे. त्यामुळं रेल्वे प्रवासात ज्यांना पैशांची गरज आहे ते सहज रक्कम काढू शकणार आहेत. मात्र असे असली तरे रेल्वेत फिरणाऱ्या गर्दुल्यापासून एटीएम सुरक्षित ठेवणे तेवढेच आव्हानात्मक असणार आहे.