Mumbai Rain : मुंबईत पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. 24 जून ते 28 जून या दरम्यान समुद्राला मोठी भरती येणार असून समुद्राच्या लाटा साडे चार मीटरपेक्षा जास्त उसळणार आहेत. त्यामुळे यावेळी कोणत्याही नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये असा अलर्ट मुंबई महापालिकेने दिला आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्यामुळे नागरिकांनी काळजी घेऊनच बाहेर पडावं असं महापालिकेने म्हटलं आहे.
यंदा मान्सून हा मे महिन्यातच सक्रीय झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यात समुद्राला मोठी भरती येणार आहे. ही येणारी भरती 19 वी सर्वात मोठी भरती असणार आहे. यावेळी साडेचार मीटरपेक्षा अधिक उंचीच्या लाटा समुद्रात उसळताना बघायला मिळणार आहेत.
महापालिकेकडून अलर्ट जारी
यंदा मे महिन्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अशातच रात्रीपासूनच मुसळधार पाऊस मुंबईत पडत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने अलर्ट जारी केला आहे. यामध्ये भरती दरम्यान समुद्र किनारी नागरिकांनी जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसेच 26 जूनला समुद्रकिनारी मोठ्या लाटा उसळणार असल्याची माहिती देखील मुंबई महानगरपालिकेने दिली आहे.
पालिकेने दिलेल्या सुचनाचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन मुंबई महापालिकेकडून करण्यात येत आहे. तसेच यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या भरतीचा तपशील देखील पालिकेने आपत्कालीन व्यवस्थापन विभागामार्फत जाहीर केला आहे.
मुंबईकरांनो काळजी घ्या
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे संसर्गजन्य आजारांनी डोके वर काढले आहे. अशातच पालिकेने पावसाळ्यातील आजारांना आळा घालण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत दोन आठवड्यांत मलेरियाचे 341 तर डेंग्यूचे 48 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे पालिकेकडून मुंबईकरांनी काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी पाची साचल्यामुळे गॅस्ट्रो, टायफाईड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया पसरत आहेत. पावसाळी आजार टाळण्यासाङ्गी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ खेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नयेत, गरज असल्यास पालिकेच्या दवाखान्यात संपर्क करावा, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.