Mumbai Women Cancel Railway Ticket: मुंबईमध्ये रेल्वे तिकीट रद्द करणं एका महिलेला फारच महागात पडलं आहे. रद्द केलेलं हे तिकीट या महिलेला तब्बल 2 लाखांना पडलं आहे. झालं असं की रेल्वेचे तिकीट रद्द करताना या गृहिणी असलेल्या महिलेने कस्टमर केअरमधील तोतया व्यक्तीने पाठवलेली फाइल डाऊनलोड केली. ही फाइल डाऊनलोड करताच गृहिणीच्या खात्यातून दोन लाख दोन हजार 98 रुपये खात्यातून काढून घेण्यात आल्याचा मेसेज आला. आपली फसवणूक झाली आहे हे समजेपर्यंत महिलेच्या खात्यातून 2 लाखांहून अधिक रक्कम लंपास करण्यात आलेली. याप्रकरणी महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून वर्सोवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या महिलेबरोबर हा प्रकार घडला तिचं नाव वंदना भाटिया असं असून त्या अंधेरी पश्चिममधील न्यू म्हाडा टॉवर येथे राहतात. वंदना यांनी 26 जानेवारीचं मुंबई-अहमदाबाद ट्रेनचे तिकीट अॅपवरून काढले. मात्र, अहमदाबादला जाणे रद्द झाल्याने त्यांनी 26 जानेवारीला सकाळी 7 वाजता संबंधित अॅपद्वारे तिकीट रद्द करण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे तिकीट रद्द झाले नाही. मात्र, अर्ध्या तासाने त्यांना एका अनोळखी व्यक्तीने फोन करत आपण रेल्वेच्या कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगितले.
तिकीट रद्द करून पैसे परत हवे असल्यास मी पाठवलेली 'कॅन्सल डॉट एपीके' फाइल डाऊनलोड करून माहिती भरा, असे फोनवरील व्यक्तीने सांगितले. भाटिया यांनी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, मोबाइल क्रमांक भरला. मात्र, ओटीपी शेअर करण्यास नकार देताच त्यांना चार शून्य टाइप करा, असे तो म्हणाला. या महिलेने तो क्रमांका टाइप करताच त्यांच्या बँक खात्यातून 20 हजार रुपये काढले गेले. भाटिया यांनी याबाबतची माहिती त्यांच्या बँकेच्या कस्टमर केअरला देत व्यवहार थांबविण्यास सांगितले.
दहा मिनिटांनी पुन्हा त्यांनी बँक खाते तपासले असता, त्यातून एक लाख 52 हजार 98 रुपये, तर क्रेडिट कार्डमधून 50 हजार रुपये, असे एकूण दोन लाख दोन हजार 98 रुपये डेबिट झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे त्यांनी वर्सोवा पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी), (ड) तसेच बीएनएस कायद्याचे कलम 318 (4) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.