Mumbai Pune Expressway News: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील प्रवास आरामदायी आणि आणखी वेगवान होण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) खोपोली ते कुसगावदरम्यान नवी मार्गिकेचे काम हाती घेतले आहे. 19.80 किमी लांबीच्या मिसिंग लिंकचे काम आता शेवटच्या टप्प्यात आहे. सुरुवातीला ऑगस्ट महिन्यात मिसिंग लिंक प्रवाशांसाठी सुरू होण्याची शक्यता होती. मात्र काही कारणांमुळं प्रकल्पाला विलंब झाला. त्यामुळं आता नोव्हेंबरअखेरीस पूर्ण करून डिसेंबरमध्ये मार्गिका वाहतूक सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे. तसे नियोजन एमएसआरडीसीकडून सुरू आहे. या मिसिंग लिंक सुरू झाल्यानंतर नागरिकांना मुंबई-पुणे महामहार्गावरील प्रवास सुस्साट होणार आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळं सुट्टीच्या दिवसांत किंवा सणा-सुदीच्या दिवसांत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. तसंच, महामार्गाच्या अपुऱ्या रुंदीमुळं अपघातांची भिती वाढली आहे. त्यामुळं प्रशासनाने खोपोली-कुसगावदरम्यान 19.80 किमी लांबीची नवीन मार्गिका अर्थात मिसिंग लिंक बांधण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
मिसिंग लिंक मार्गिकेवर दोन बोगद्यांचा समावेश आहे त्यापैकी एक बोगदा 1.75 किमी तर दुसरा बोगदा 8.92 किमी लांबीचा आहे. तर यापैकी 8.92 किमी लांबीचा बोगदा हा आशियातील सर्वात रुंद असा डोंगराखालून आणि तलावाखालून जाणारा बोगदा आहे. लोणावळा येथील तलावाच्या तळाखाली जवळपास 500 ते 600 फूट अंतरावर हा बोगदा असून या बोगद्याची रुंदी 23.75 मीटर आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन या बोगद्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
मिसिंग लिंकचे काम आत्तापर्यंत 93 टक्के पूर्ण झाले आहे. या मार्गाचे वैशिष्ट्य म्हणजे नवी मार्गिका ही दऱ्याखोऱ्यातून जात असून या मार्गावर 100 मीटर खोल दरीत पूल बांधण्यात येत आहेत. हा पूल बांधणे आव्हानात्मक होते. अत्यंत खडतर परिस्थितीत या पुलाचे बांधकाम पार पडले आहे. आत्तापर्यंत 95 टक्के काम पूर्ण झाले असून डिसेंबरमध्ये ही मार्गिका सेवेत येण्याची शक्यता आहे.