Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

धक्कादायक! मुरबाडमध्ये घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला, महिलेचा मृत्यू, चिमुरडी जखमी

महिलेचा पती कामावर गेला असताना हल्लेखोराने घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला केला. हल्ला केल्यानंतर हल्लेखोर फरार झाला आहे

धक्कादायक! मुरबाडमध्ये घरात घुसून मायलेकींवर कोयत्याने हल्ला, महिलेचा मृत्यू, चिमुरडी जखमी

चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर : घरात घुसून मायलेकीवर कोयत्याने हल्ला करत महिलेची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मुरबाड (Murbad) तालुक्यातील साजई गावात घडली आहे. या हल्ल्यात सात वर्षाची चिमुकलीची गंभीर जखमी झाली असून हल्लेखोर फरार झाला आहे. या घटनेने मुरबाडमध्ये खळबळ उडाली असून पोलीस  (Murbad Police) अधिक तपास करत आहे. हल्लेखोर गावातीलच असल्याचा संशय पोलिसांना आहे. 

नेमकी घटना काय
शेखर बांगर हे मुरबाडमधल्या साजई या गावात आपल्या कुटुंबासह राहातात. गुरुवारी ते नेहमीप्रमाणे आपल्या कामावर गेले. यावेळी घरी बांगर यांच्या पत्नी चंदना बांगर आणि मुलगी श्रावणी दोघेच घरात होते. दुपारची वेळ असल्याने गावात शांतता होती. याचा फायदा घेत एक अज्ञात व्यक्ती बांगर यांच्या घरात घुसला. त्याने कोयत्याचा (Koyta) धाव दाखवत चंदना यांच्याकडे सोनं आणि दहा हजार रुपयांची मागणी केली. 

चंदना बांगर यांनी सोनं आणि पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरोपीने चंदना यांच्यावर कोयत्याने वार करण्यास सुरुवात केली. यावेळी चंदना यांची सात वर्षांची मुलगी श्रावणी ही आईला वाचवण्यासाठी आली, यावेळी आरोपीने तिच्यावरही कोयत्याने वार केला. हल्ला केल्यानंतर आरोपी तिथून पळून गेला. हल्ल्यात चंदना बांगर या गंभीर जखमी झाल्या. हल्ल्याची माहिती चंदना बांगर यांच्या गावातच राहाणाऱ्या भावाला कळली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत चंदना यांना रुग्णालयात दाखल केलं. पण अतिरक्तस्त्र झाल्याने उपचारादरम्यान चंदना बांगर यांचा मृत्यू झाला.

श्रावणी हिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरु आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान हल्लेखोर साजई गावातील असल्याचं श्रावणीचा मामा गोविंद यांचं म्हणणं आहे. हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला की यामागे इतर काही कारण आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

Read More