Nagpur Crime News: नागपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुर शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर सहा आरोपींनी नागपूर आणि यवतमाळ येथे सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून आरोपींवर सामूहिक बलात्कार, पीटा अॅक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागपूर आणि यवतमाळ येथून आरोपींना पकडण्यात आले असून त्यात नागपूर दोन आणि यवतमाळचे चार आरोपींचा समावेश आहे.
सामूहिक अत्याचारातील सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता 24 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढू शकते. पीडित 17 वर्षीय मुलगी महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. 11जुलै रोजी ती घरातून बाहेर पडली होती. हुडकेश्वर पोलिसांनी तिला तीन तासांच्या आत शोधून काढत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले होते. मात्र, 16 जुलै रोजी ती पुन्हा बेपत्ता झाली कुटुंबीयांनी शोध घेतला परंतु ती सापडली नाही. अखेर कुटुंबीयांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
तपासादरम्यान उघड झालेल्या माहितीनुसार, ती विद्यार्थिनी दोन मित्रांच्या संपर्कात असल्याचे ही निष्पन्न झाले. त्या दोघांनी तिला एकांत ठिकाणी नेऊन जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केला व सोडून दिले. त्यानंतर ती यवतमाळकडे निघून गेली. अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे एक पथक तिचा शोध घेत होते. तपासादरम्यान ती यवतमाळच्या मादणी येथे असल्याची माहिती मिळाली. पीडितेच्या कुटुंबीयांसोबत हुडकेश्वर पोलिसांचे पथक 18 जुलै रोजी यवतमाळला पोहोचले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर तिला नागपुरात आणून महिला पोलीस अधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला. वैद्यकीय तपासणीनंतर सामूहिक बलात्कार, पीटा अॅक्ट आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.
हुडकेश्वर पोलिसांच्या पथकाने 24 तासांत आरोपींना जेरबंद केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेची ओळख सोशल मीडियाच्या माध्यमातून यवतमाळच्या एका युवकासोबत झाली होती. मोबाईल क्रमांकाची देवाणघेवाण झाल्याने दोघांमध्ये संपर्क सुरू होता. त्या युवकाने तिला यवतमाळला बोलावले. 17 जुलै रोजी ती त्याच्या घरी पोहोचली. त्याच दिवशी त्याने तिला एका खोलीत नेले, जिथे चार आरोपींनी तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. विरोध केल्यावर तिला मारहाण करण्यात आली. दुसऱ्या दिवशी, 17जुलै रोजी, तिला यवतमाळजवळील शेतात नेऊन पुन्हा चारही आरोपींनी सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणात आतापर्यंत सहा आरोपी अटकेत आहे