Nanded Crime News: शासकीय नोकरी मिळण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून स्वतःच्या मुलीला विकल्याच्या प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आलाय. आईच्या तक्रारीवरून या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. मात्र या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे.
अनुकंपा तत्वावर मिळणाऱ्या शासकीय नोकरीसाठी अडचण येऊ नये म्हणून वडिलांनी आपल्या पोटच्या मुलीला विकल्याचा प्रकार समोर आला आहे. या आरोपाखाली वडिलांवर गुन्हा दाखल झाला आहे. सुरेखा ह्या महिलेचा 2009 साली गजानन वांजरखेडे यांच्याशी विवाह झाला होता. या दांपत्याला एक मुलगा आणि दोन मुली झाल्या. दरम्यान वडिलांचे निधन झाल्याने गजानन वांजरखेडे यांना अनुकंपा तत्वावर 2018 मध्ये दुय्यम उनिबंधक कार्यालयात शिपाई पदाची नोकरी लागणार होती.
नोकरीसाठी तिसऱ्या आपत्याची अडचण येईल म्हणून एक मुलगी दुसऱ्याला देण्याचा विचार होता. या विषयावरून दोघा पती पत्नीमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की त्याने पत्नी सुरेखा हिला घराबाहेर हाकलून देण्यात आले. तिन्ही मुले ही पतीकडेच राहत होती. पतीच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सुरेखा यांनी लोकांच्या घरी धुणी भांडी करून गुजराण केली.
मात्र काही दिवसांनी आपल्या एका मुलीला पतीने एका नातेवाईकाला दिल्याची माहिती काही महिन्यापूर्वी सुरेखा यांना समजली. कुठलाही आधार नसणाऱ्या सुरेखा यांनी एका वकिलांशी संपर्क साधल्या नंतर त्यांना निराधार महिलांना मदत करणाऱ्या एन जी ओ बद्दल माहिती मिळाली. एनजीओच्या टीमने ज्यांच्याकडे मुलगी आहे तिथे संपर्क केला. त्या गावातून मुलीच्या शाळेतील माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव दुसऱ्या व्यक्तीचे आढळले. मुलीचा जन्म ज्या रुग्णालयात झाला तिथून माहिती घेतल्यानंतर वडिलांचे नाव वेगळे होते.
एनजीओ कडून आवश्यक कागदपत्रे मिळाल्यानंतर सुरेखा यांनी भाग्यनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. माझ्या मुलीला एक लाख रुपयात विकल्याचा आरोप त्यांनी केला. माझ्या मुलांना माझ्याकडे सोपवण्यात यावे आणि पती विरुद्ध कडक कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलीये.
मुलीच्या जन्मावेळी तिच्या वडिलांचे नाव आणि शाळेत टाकल्यानंतर आताचे नाव यात तफावत असल्याने आणि सांभाळ करणाऱ्या जोशी दांपत्याकडे मुलगी दत्तक घेतल्याचा कुठलाही पुरावा नसल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करताहेत.