Nashik Crime News: नाशिकच्या सातपूर परिसरात एका धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. अशोकनगरमधील ज्ञानगंगा क्लासजवळ दहावीच्या तीन विद्यार्थ्यांमध्ये बेंचवर बसण्याच्या कारणावरून वाद झाला आणि त्यातूनच एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव यशराज तुकाराम गांगुर्डे (वय 16) असं असून तो सातपूरमधील एका शाळेत शिक्षण घेत होता.
ही संपूर्ण घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास घडली आहे. यशराज गांगुर्डे हा नेहमीप्रमाणे ज्ञानगंगा क्लासमध्ये क्लासच्या बसने आला होता. बस क्लासजवळ पोहोचताच आधीच उपस्थित असलेल्या दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला.
हा वाद विकोपाला जाताच यशराजला छातीत जोरदार गुद्दे मारण्यात आले. मार लागल्याने त्याच्या नाकातून रक्त येऊ लागले आणि तो तिथेच चक्कर येऊन कोसळला. त्यानंतर त्याला तात्काळ तेथील स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र, यशराजचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सध्या परिसरात एकच खळबळ उडाली.
नाशिकच्या सातपूर परिसरात घडलेल्या या घटनेनंतर या प्रकरणी सातपूर पोलिसांनी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मात्र, हल्ला नेमका आधीपासून नियोजित होता का हे तपासलं जात आहे.
नाशिकमधील सातपूर येथील या घटनेमुळे संपूर्ण नाशिक शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. शाळा आणि क्लास परिसरात मुलांच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. पालकांमध्येही या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अनेकांनी शाळा व क्लासमधील शिस्तबद्ध व्यवस्थेची मागणी केली आहे.
तर नाशिकमध्ये आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. श्रावण मासानिमित्त बळी मंदिरात पारायणास जाणाऱ्या एका वृद्ध महिलेला भरधाव ट्रकने चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून या घटना महाराज मंदिर चौफुलीवर हा अपघात झाला. ट्रकचालक फरार असून पोलिस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत. राधाबाई गायकवाड असे या महिलेचे नाव असून पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिलमध्ये पाठवला आहे. संशयित चालका विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.