Nashik Crime News : सायबर गुन्हेगारीचे रोज अनेक नवनविन प्रकार समोर येत असतांनाच नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनोळखी फेसबुक फ्रेंड महिलेने तब्बल 55 लाख रुपयांना गंडा घातल्याने एका कृषी अधिकाऱ्याने विषारी औषध सेवन करत आपले जीवन संपवले आहे. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अधिकाऱ्याच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनूसार पोलीसांनी गुन्हा दाखल करत तपासाला सुरुवात केली आहे.
सायबर गुन्हेगारीने सध्या चांगलच डोकं वर काढलय, काही ना काही नवनविन शक्कल लढवत सायबर गुन्हेगार नागरिकांना सहजपणे आपल्या जाळ्यात ओढतायत आणि अशाचप्रकारे सायबर गुन्हेगारांनी दाखवलेल्या आमिषाला बळी पडत जवळपास 56 लाखांची फसवणूक झाल्याने पालघर जिल्ह्यातील जव्हार पंचायत समितीत कृषी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या प्रशांत पाटील यांनी 6 जून 2025 रोजी आत्महत्या करत आपले जीवन संपवले आहे. प्रशांत पाटील यांची फेसबुकवर एका अनोळखी महिलेसोबत मैत्री झाली होती, या महिलेने हापको ऑइलच्या व्यवसायाचे पाटील यांना आमिष दाखवले होते. आमच्याकडून ऑइलची स्वस्तात खरेदी करून त्याची विक्री केल्यास भरघोस नफा मिळेल असे त्यांना सांगण्यात आले होते. सुरुवातीला त्यांना या महिलेकडून ऑईल मिळाले देखील होते.
फेसबुक फ्रेंडने प्रशांत पाटील यांना जवळपास 55 लाख 79 हजार 300 रुपये रक्कम विविध बँक अकाउंटमध्ये भरण्यास भाग पाडले होते. त्यासाठी त्यांनी बायकोचे 30 तोळे सोन्याच्या दागिन्याची देखिल विक्री केली होती. आपल्या मित्रांकडून देखील त्यांनी पैसे गोळा केले होते. मात्र, त्यानंतर ऑइल मिळाले नाही यासोबतच कर्जाची परतफेड कशी करायची ही चिंता त्यांना लागली होती आणि याच सर्व ताणतणावातून त्यांनी टोकाचे पाऊल उचलले.
बायको आणि सहावीत शिकणाऱ्या आपल्या मुलीसह पाटील सिडको परिसरात असलेल्या मातोश्री या अपार्टमेंट वास्तव्यास होते. मात्र, प्रशांत पाटील यांनी या जगाचा निरोप घेतला आणि त्यांच्या पत्नीने देखिल हे घर सोडलं. दरम्यान याबाबत अंबड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पत्नीच्या तक्रारीनंतर सायबर पोलिसात फसवणुकीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. प्रशांत पाटील यांच्यासह अनेकांची अशाप्रकारे ऑईल व्यवसायाच्या नावाखाली फसवणूक झाल्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होते आहे. यात अगदी लहान मुलांपासून तरुणांचाही मोठा सहभाग बघायला मिळत असून ही चिंतेची बाब ठरते आहे. अशा पद्धतीचे अनेक रुग्ण हे आमच्याकडे येत आहे आर्थिक फसवणुकीच्या कारणावरून टोकाचे पाऊल उचललं जातं यामुळे आर्थिक फसवणूक झालेल्यांनी कुटुंबातील पत्नी भाऊ किंवा मित्राशी मन मोकळे पद्धतीने बोलणे गरजेचे आहे. या मानसिक तणावातून बाहेर पडण्यास यातून मदत होते त्याचबरोबर ऑनलाईन आलेली रिक्वेस्ट फेसबुक इंस्टाग्राम अन्य सोशल मीडियातून तर ती स्वीकारू नये अशा पद्धतीचा आवाहन देखील मानसोपचार तज्ञांकडून करण्यात आला आहे. तुमची वैयक्तिक माहिती, ओटीपी कुणालाही शेअर करू नका.. सायबर गुन्हेगारांनी दिलेल्या कोणत्याही आमिषाला किंवा धमकीला बळी पडू नका असं वारंवार आवाहन पोलिसांकडून केले जाते. मात्र, तरी देखील सायबर गुन्हेगारीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे बघायला मिळत असून ही गुन्हेगारी रोखण्याचे मोठं आव्हान पोलिसांसमोर सध्या निर्माण झाले.