Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

मालेगावमध्ये नशेसाठी वापरल्या जाणा-या कुत्तागोळीसह गुंगी आणणा-या औषधांचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय. तरूणाईला या कुत्तागोळीचं मोठ्या प्रमाणात व्यसन लागल्याचं समोर आलंय. या ड्रगनं पालकवर्गाची चिंता वाढलीय. 

तरुणाई कुत्ता गोळीच्या विळख्यात, डॉबरमॅन, बुलडॉग नावाने बाजारात होते विक्री

निलेघ वाघ, झी मीडिया, मालेगाव : दारु, सिगारेट, ड्रग्ज अशा व्यसनात तरुण पिढीअडकत चालली आहे. यात आता नविन कुत्ता गोळीची (kutta goli) भर पडली आहे. तरूणाई सध्या कुत्ता गोळीच्या व्यसनात अडकली आहे.. नशेच्या बाजारात ही गोळी सहज उपलब्ध होते. मालेगावच्या (Malegaon) अहमदपुरा भागात कुत्ता गोळीची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे सापळा रचून पोलिसांनी तिघांना अटक केलीय. त्यांच्याकडून तब्बल 15 हजार 800 कुत्ता गोळी आणि नशेच्या 25 बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी 6 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केलाय.

काय आहे कुत्ता गोली? 
या गोळीचं नाव अल्प्रलोजोम (alprazom) अंस आहे. ही गोळी घेतल्यानंतर शरीर सुन्न होतं. त्यानंतर शारिरीक किंवा मानसिक दुःखाचा विसर पडतो. गोळीतलं केमिकल थेट मेंदूवर आघात करतं. त्यामुळे झोप येते. गोळ्यांच्या अतिसेवनानं ती व्यक्ती हिंसक बनू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्यांची विक्री करण्यास मनाई आहे. मात्र काही मेडिकल स्टोअर्स (Medica Stores) या गोळ्या सर्रासपणे विकतात. याच्या 15 गोळ्या 36 रुपयांना मिळतात. शिवाय याची नशा करताना कोणतीही अडचण येत नाही.

ड्रग माफियांनी या गोळीला वेगवेगळी नावं दिलीयेत. डॉबरमॅन, बुलडॉग, जर्मन शेफर्ड अशा  टोपणनावांनी ही गोळी बाजारात विकली जाते. नशेच्या बाजारात ही गोळी 20 ते 100-150 रूपयांपर्यंत सहज उपलब्ध होते. तरूणाईला या कुत्ता गोळीचं अक्षरश: वेड लागलंय. दारु किंवा इतर अंमली पदार्थाच्या तुलनेत या गोळ्या स्वस्त आहेत. शिवाय झिंगही लगेच येत असल्याने अनेक तरुण या कुत्ता गोळीचे व्यसन (Addiction) करु लागले आहेत. एक ते दोन रुपयांना मिळणारी गोळी दारूच्या तुलनेत स्वस्त असल्याने कुत्ता गोळीची मागणी वाढली आहे.  धक्कादायक म्हणजे अवघ्या दहा रुपयांत दहा कुत्ता गोळ्या खाल्ल्यास नशा चढते. शाळकरी मुलांच्या दप्तरांमध्ये या गोळ्या सर्रास सापडू लागल्यात.  

या गोळीची विक्री थांबवण्यासाठी तसंच तरुणांनी याची नशा करु नयेसाठी पोलिस (Police) विशेष प्रयत्न करत आहेत. पण इतक्यावरच न थांबता ही बाब गांभीर्यानं घेऊन पोलिसांनी नशेच्या व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करायला हवी. परराज्यात या गोळ्याचं उत्पादन होत असून महाराष्ट्रात त्याची छुप्या पद्धतीनं विक्री केली जातेय.  अन्यथा एक अख्खी पिढी बरबाद व्हायला फारसा वेळ लागणार नाही

Read More