Marathi News> महाराष्ट्र बातम्या
Advertisement

'...तर सत्तेतून बाहेर पडा' राष्ट्रवादीला शिवसेनेनं पुन्हा डिवचले; गोगावलेंच्या मुलाखतीनंतर वाढला तणाव!

Bharat Gogawale: रायगडच्या शिवसेनेनं थेट तटकरेंना आव्हान दिलंय. सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर राष्ट्रवादीनं सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

'...तर सत्तेतून बाहेर पडा' राष्ट्रवादीला शिवसेनेनं पुन्हा डिवचले; गोगावलेंच्या मुलाखतीनंतर वाढला तणाव!

Bharat Gogawale: भरत गोगावलेंनी झी 24 तासला दिलेल्या मुलाखतीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीतला तणाव वाढलाय. राष्ट्रवादीनं गोगावलेंवर राजकीय गुन्हेगारीचा आरोप केलाय. राष्ट्रवादीच्या आरोपानंतर शिवसेना आक्रमक झाली असून सिंचनाचे आरोप टोचत असतील तर सरकारमधून बाहेर पडावं असा सल्ला शिवसेनेनं दिलाय.

रोजगार हमीमंत्री भरत गोगावलेंनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंना सिंचन घोटाळ्यावरुन डिवचलं होतं...ज्यांनी घोटाळे केलेत त्यांना त्याची फळं भोगावी लागतील असा टोलाही त्यांनी लगावला होता. भरत गोगावलेंनी झी 24 तासच्या टू द पॉईंट मुलाखतीत तटकरेंवर अनेक गंभीर आरोप केले. एवढंच नाही तर सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरही बोचरी टीका केली. झी 24 तासवरील मुलाखतीत केलेल्या आरोपानंतर राष्ट्रवादीनंही पत्रकार परिषद घेऊन भरत गोगावलेंना प्रतिआव्हान दिलं.

राष्ट्रवादीनं भरत गोगावलेवर राजकीय गुन्हेगारीचा आरोप केल्यानं शिवसेनाही चवताळलीये. रायगडच्या शिवसेनेनं थेट तटकरेंना आव्हान दिलंय. सिंचन घोटाळ्याचे आरोप टोचत असतील तर राष्ट्रवादीनं सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान शिवसेनेनं दिलंय.

झी 24 तासच्या मुलाखतीत भरत गोगावलेंनी तटकरेंवर केलेल्या आरोपांमुळं शिवसेना आणि राष्ट्रवादीतला वाद चव्हाट्यावर आलाय. राष्ट्रवादीच्या महायुतीतल्या समावेशापासून दोन्ही पक्षात सख्य नव्हतंच आता ही दरी आणखी रुंदावल्याचं स्पष्ट होऊ लागलंय

गोगावलेंवर व्हिडीओ बॉम्ब 

झी 24 तासच्या मुलाखतीतून रश्मी ठाकरेंवर आरोप करणा-या रोहयोमंत्री भरत गोगावलेंवर व्हिडिओ बॉम्ब टाकलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंचा एक व्हिडिओ समोर आणलाय. या व्हिडिओत भरत गोगावले बगलामुखी यज्ञ करत असल्याचा दावा मोरेंनी केलाय. राजकीय विरोधकांवर मात करण्यासाठी उज्जैनच्या पुजा-यांना बोलावून हा यज्ञ केल्याचा आरोप वसंत मोरेंनी केलाय.वसंत मोरेंच्या व्हिडिओ बॉम्बचा भरत गोगावलेंनी नकार दिलेला नाही. वसंत मोरेंना राजकारणात काही मिळवायचं असेल तर त्यांना पुजेला नेतो अशी ऑफरही त्यांनी दिलीय. अंधश्रद्धा निर्मुलन समितीने वसंत मोरेंनी समोर आणलेल्या या व्हिडिओवर संताप व्यक्त केलाय. अंधश्रद्धेला खतपाणी घालणा-याला भरत गोगावलेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी अंनिसनं केलीय. पुरोगामीत्वाचा वारसा सांगणा-या महाराष्ट्रात मंत्रिमंडळातला एक मंत्री अघोरी पुजा करत असेल तर ते महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही... भरत गोगावलेंना याबाबत सरकारनं जाब विचारायला हवा अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय.

Read More