राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडली आहे. यामुळे मागील 6 महिन्यांपासून बाजुला पडलेल्या भुजबळांचा पुनर्वसन झालं आहे. मात्र दुसरीकडे भुजबळांच्या एन्ट्रीमुळे धनंजय मुंडे यांचा मंत्रिमंडळातील प्रवेश कठिण झाल्याचं बोललं जात आहे.
धनंजय मुंडेंसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद?
भुजबळांच्या एन्ट्रीमुळे मुंडेंचा प्रवेश अवघड
धनंजय मुंडेंना 5 वर्ष वाट पाहावी लागणार का?
महाराष्ट्राच्या राजकारणात काल नाट्यमय राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या आणि महायुतीच्या दुसऱ्या टर्ममध्ये मंत्रिपदापासून दूर राहिलेल्या छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. छगन भुजबळांचं हे कम बॅक राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी मात्र धोक्याचं ठरलं आहे. कारण भुजबळांच्या एन्ट्रीमुळे धनंजय मुंडेंसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद झालेत का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली आहे. त्यामुळेच नाराज झालेल्या धनंजय मुंडेंची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी समजूत काढल्याचं पाहायला मिळतंय. वर्षा बंगल्यावर तिन्ही नेत्यांमध्ये मंगळवारी बैठक झाली..
धनंजय मुंडेंसाठी मंत्रिमंडळाचे दरवाजे बंद? सूत्रांची माहिती
- भुजबळांना मंत्रिमंडळात घेण्यापूर्वी अजित पवारांसह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी धनंजय मुंडेंची समजूत काढली
- भुजबळांचा शपथविधी झाल्यानंतर मंगळवारी रात्रीही वरिष्ठ नेत्यांकडून मुंडेंची समजूत काढण्याचा प्रयत्न
- मंत्रिमंडळात परत घेण्याबाबत धनंजय मुंडे होते आशावादी
- मात्र भुजबळांना मंत्री केल्यामुळे धनंजय मुंडेंचा पत्ता कायमचा कट झाल्याने ते नाराज असल्याची माहिती
तर महायुतीमध्ये कोणीही नाराज होणार नाही याचं कौशल्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचा विश्वास भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांच्या घेतलेल्या भेटीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी खोचक टोला लगावला आहे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यानंतर मुंडेंचं मंत्रिपद रिक्त होतं. तोपर्यंत धनंजय मुंडे यांना पुन्हा परतण्याची आशा होती. मात्र छगन भुजबळांच्या एन्ट्रीमुळे धनंजय मुंडे यांचं कमबॅक धोक्यात आलंय. त्यामुळे आता पुनर्वसनासाठी मुंडे यांना आता मोठी प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.